आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग करून घेतले शूटिंग, पाच जणांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 09:04 PM2018-10-29T21:04:30+5:302018-10-29T21:05:12+5:30
अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणा-या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा पाच आरोपींनी जंगलात विनयभंग करून मोबाईलमध्ये शूटिंग घेतले. त्या सर्व आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
गडचिरोली - अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणा-या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा पाच आरोपींनी जंगलात विनयभंग करून मोबाईलमध्ये शूटिंग घेतले. त्या सर्व आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी (दि.२८) पेरमिलीच्या आश्रमशाळेतील ती विद्यार्थिनी अकरावीत शिकणाºया आपल्या मित्रासोबत दुपारी २ च्या सुमारास जंगलात फिरायला गेले होते.
दरम्यान त्यांच्या मागावर असलेल्या यशवंत मनोहर दुर्गे (१९) व त्याच्या तीन १७ वर्षीय मित्रांनी त्यांना जंगलात गाठले. तिथे त्या युवतीचा विनयभंग करून त्याचे मोबाईलमध्ये शुटींग केले. दरम्यान आरोपी मानतू शंकर ईष्टाम (३०) हा इसम तिथे पोहोचला असता त्यानेही तिचा विनयभंग केला.
या प्रकाराची तक्रार पोलिसात दिल्यानंतर पाचही आरोपींविरूद्ध भादंवि कलम ३५४ (अ), (ब), ३२३, ५०४, ५०६, ३४ तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ८, १२ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ई) अन्वये गुन्हे दाखल केले.
विनापरवाना पडले होते शाळेबाहेर
पीडित युवती आश्रमशाळेतून कशी बाहेर पडली याबाबत मुख्याध्यापकांना विचारणा केली असता ती कोणतीही परवानगी न घेता कंपाऊंड वॉलवरून उडी मारून गेली असावी, अशी माहिती त्यांनी दिली. तिचा मित्र त्याच आश्रमशाळेत अकरावीला शिकतो. दोघांच्याही बाहेर जाण्याबद्दल आश्रमशाळा प्रशासन अनभिज्ञ होते. या पद्धतीने अल्पवयीन विद्यार्थी बाहेर पडत असतील तर आश्रमशाळेतील त्यांचे वास्तव्य किती सुरक्षित आहे, असा प्रश्न पडतो.