ठाण्यातून बेपत्ता झालेली मुलगी मुंबईत सापडली, चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 09:02 PM2022-07-25T21:02:33+5:302022-07-25T21:03:12+5:30

Missing Girl : ठाणे पोलिसांनी घेतला तातडीने शोध

Missing girl from Thane found in Mumbai, achievement of Child Protection Unit | ठाण्यातून बेपत्ता झालेली मुलगी मुंबईत सापडली, चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची कामगिरी

ठाण्यातून बेपत्ता झालेली मुलगी मुंबईत सापडली, चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची कामगिरी

Next

ठाणे: ठाण्यातील वागळे इस्टेट भागातून बेपत्ता झालेली सोफिया पठाण (९ वर्षे, नाव बदलले आहे) ही मुलगी मुंबईच्या माटुंगा येथील मानव सेवा संघ या संस्थेमध्ये आढळली. अवघ्या २४ तासांमध्ये ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने तिचा शोध घेतला. मात्र, तिने आई वडिलांकडे जाण्यास नकार दिल्याने पोलिसांपुढेही पेच निर्माण झाला होता. समुपदेशनानंतर अखेर तिला साेमवारी पालकांच्या स्वाधीन केले.

वागळे इस्टेट भागातून सोफिया बेपत्ता झाली असून तिच्या अपहरणाचा गुन्हा पोलीस ठाण्यात २३ जुलै २०२२ रोजी दाखल झाला होता. ही माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला समजताच त्यांनी याची गांभीर्याने दखल घेतली. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाईल्ड प्रोटेक्शन युनिटचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे, जमादार एस. एन. जाधव, एस. एम. कदम, व्ही. एस. बडगुजर, पोलीस हवालदार एच.एम. तळेकर, एस. टी. चौधरी, टी. जी. शिरसाठ आणि एस.डी. कांबळे आदींच्या पथकाने ठाणे शहर आणि ग्रामीणसह मुंबई तसेच नवी मुंबईतील शासकीय आणि खासगी महिला आणि बालगृहांना भेट देऊन या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली.

याच दरम्यान, मांटुंगा येथील एका संस्थेमध्ये ही मुलगी असल्याची माहिती २३ जुलै रोजी कोपरीतील सलाम बाल ट्रस्ट येथील समाजसेविका श्रद्धा नारकर यांच्याकडून पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने माटुंगा येथील मानव सेवा संघ या संस्थेच्या भावना वाळके यांच्याशी संपर्क साधून याबाबतची खात्री केली. तेंव्हा बेपत्ता सोफिया त्याठिकाणी आढळली. मुलीच्या आईला चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या कार्यालयात बोलावून वाळके यांच्या मोबाईलवर व्हीडिओ कॉल करून तिच्या वडिलांची भेट घडवून आणण्यात आली. २५ जुलै रोजी तिला ठाण्यात आणण्यात आले. मात्र, मुलीने तिच्या आई-वडिलांकडे जाण्यास नकार दिल्याने पोलिसांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला. अखेर तिचे समुपदेशन करुन तिला पालकांकडे सुपूर्द केले. घरात क्षुल्लक कारणावरुन आई वडिलांवर नाराज झाल्याने तिने घर सोडल्याची कबुली दिली.

Web Title: Missing girl from Thane found in Mumbai, achievement of Child Protection Unit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.