मिसिंग मिस्ट्रीचा करुण अंत, माय-लेकाचे अपहरण; मुलाची हत्या, वृद्धेची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 06:33 AM2023-05-04T06:33:28+5:302023-05-04T06:33:39+5:30
पाच जणांना अटक, मालमत्ता नावावर करून घेण्यासाठी रोहिणी यांचे अपहरण करून त्यांना आधी राजस्थानात, त्यानंतर गोरेगाव परिसरात डांबून ठेवण्यात आल्याचे समजताच पोलिसांच्या तपास पथकाने तिथे धाव घेतली.
मुंबई - मालमत्तेच्या लोभापोटी माय-लेकाचे अपहरण करून त्यातील मुलाची हत्या करणाऱ्या पाच नराधमांना चेंबूर पोलिसांनी अटक केली आहे. ५ एप्रिलपासून हे माय-लेक बेपत्ता होते. अखेरीस वृद्धेची सुटका करण्यात पोलिसांना यश आले असले तरी मुलाची हत्या केल्याची कबुली पाच जणांनी दिली आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एकनाथ देसाई यांच्या फिर्यादीवरून हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मूळचे कोल्हापूर येथील असलेल्या रोहिणी कांबळे (८०) आणि विशाल कांबळे (४४) या दोघांचे ५ एप्रिल रोजी चेंबूर येथील हॉटेलमधून अपहरण करण्यात आले. कोल्हापुरातील मालमत्तेवरून कोर्ट कचेरी सुरू असल्याने दोघे मुंबईत आले होते. रोहिणी यांच्या बहिणीने दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार २१ एप्रिलला पोलिसांत नोंदवली. त्यानंतर पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरली. २ मे रोजी अखेरीस या बेपत्ता नाट्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.
निलंबित बेस्ट बसचालक मुनीर पठाण (४१, वडाळा), चालक रोहित अदमाने (४०, पवई), राजू दरवेश (४०, मीरा रोड), केअर टेकर ज्योती वाघमारे (३३, मानखुर्द) आणि प्रणव रामटेके (२५, कोल्हापूर) या पाच जणांनी कांबळे माय-लेकाचे अपहरण केले. रोहिणी कांबळे यांना सुरुवातीला राजस्थानात एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर गोरेगावातील रॉयल पाम ब्लॉक सेक्टरमध्ये ठेवले. दुसरीकडे मुलगा विशाल याला मालमत्ता खरेदी-विक्रीच्या बैठकीसाठी पनवेलला नेऊन एका व्हिलामध्ये हत्या करून त्याचा मृतदेह बडोदा-अहमदाबाद महामार्गाच्या कडेला फेकून देण्यात आला. कांबळे माय-लेकाची मालमत्ता मिळविण्यासाठी हा कट रचण्यात आल्याची कबुली पाचही जणांनी दिली आहे. तपास सुरू असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
रोहिणी बचावल्या
मालमत्ता नावावर करून घेण्यासाठी रोहिणी यांचे अपहरण करून त्यांना आधी राजस्थानात, त्यानंतर गोरेगाव परिसरात डांबून ठेवण्यात आल्याचे समजताच पोलिसांच्या तपास पथकाने तिथे धाव घेतली. तिथे रोहिणी यांच्यावर दोघांनी पाळत ठेवली होती. पथकाने त्या दोघांना ताब्यात घेत रोहिणी यांची सुटका केली. डांबून ठेवले असताना रोहिणी यांनी आवाज करू नये, यासाठी त्यांना सतत गुंगीचे औषध दिले जात होते. त्यांना पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला.