बेपत्ता मुलाचा सहा तासांत लागला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 06:03 AM2018-10-16T06:03:56+5:302018-10-16T06:04:13+5:30
अपहरणकर्त्यास अटक; कासारवडवली पोलिसांची कामगिरी
- जितेंद्र कालेकर
ठाणे : घोडबंदर रोड येथून अपहरण झालेल्या एका तेरावर्षीय मुलाचा अवघ्या सहा ते सात तासांमध्ये कासारवडवली पोलिसांनी शोध घेऊन अपहरणकर्त्या देवानंद शर्मा (४५) याला सोमवारी पहाटेच्या सुमारास कल्याणच्या विठ्ठलवाडी भागातून अटक केली. त्याला दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.
हा मुलगा रविवारी सकाळी घोडबंदर रोड येथील ‘जांगिड’ या इमारतीसमोरून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खेळताना अचानक बेपत्ता झाला. दोन तास उलटूनही तो घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी सर्वत्र शोध घेतला. अखेर, रात्री कासारवडवली पोलीस ठाण्यात त्याच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होत असतानाच त्याचा मोबाइल देवानंद शर्माकडे लागल्याचे आढळले. त्याला दोन तासांत घेऊन येतो, असे शर्माने सांगितले. तो न आल्याने अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांनी पथक तयार केले. त्यांनी विठ्ठलवाडी परिसरात रविवारी रात्री शोध घेतला. अनेक बांधकामांच्या ठिकाणी शोध घेतल्यानंतर एका बंद खोलीतून देवानंदला या पथकांनी ताब्यात घेतले. मुलाच्या मोबाइलच्या आधारावर विठ्ठलवाडी परिसरातून त्याची सुखरूप सुटका केल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला.
अशी घडली घटना
देवानंद हा पूर्वी ठाण्यातील ‘जांगिड’ इमारतीमध्ये सुरक्षारक्षक होता. सकाळी त्याने त्याला वाघबीळ येथे नेले. पण वाघबीळला जाण्याऐवजी बसने तो ठाणे रेल्वेस्थानक येथे गेला. तिथून रेल्वेने विठ्ठलवाडी गाठले. तेथील बांधकामाच्या ठिकाणी मुलाला त्याने एका खोलीत डांबून ठेवले. मुलाने घरी फोन केल्यानंतर दोन तासांत घेऊन येतो, असे त्याने सांगितले. पण नंतर देवानंदने स्वत:चाही फोन बंद करून ठेवला. घरी फोन केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.