सोशल मीडियाचा गैरवापर वाढला; अश्लील छायाचित्र प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध सर्वाधिक गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 10:18 AM2021-01-12T10:18:05+5:302021-01-12T10:18:22+5:30
पुणे शहरात दोन वर्षांत ८० गुन्हे दाखल
- नारायण बडगुजर
पिंपरी : सोशल मीडियाचा गैरवापर होत असल्याने सायबर गुन्ह्यांमध्ये वाढत होत आहे. गतवर्ष कोरोना महामारी तसेच लाॅकडाऊनमध्ये गेले. असे असतानाही सोशल मीडियाव्दारे गुन्हेगारी कृत्ये झाली. पिंपरी-चिंचवड शहरात २०१९ मध्ये ३६ तर २०२० मध्ये ४४ गुन्हे दाखल झाले आहेत. यात सोशल मीडियाव्दारे अश्लील मेसेज करणे, व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याचे प्रकार जास्त आहेत.
स्मार्ट फोनमुळे सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्ये वाढ होत आहे. मात्र त्याच तुलनेत सोशल मीडियाचा गैरवापर देखील होत आहेत. चोरटे देखील ‘स्मार्ट’ होत असून, त्यांनी चोरीची पद्धत बदलली आहे. सोशल मीडियाव्दारे विविध अॅप्सचा वापर करून ऑनलाईन फसवणूक केली जात आहे. तसेच खरेदी विक्रीच्या बहाण्याने क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगून गंडा घातला जात आहे. पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी असल्याने येथील कंपन्यांना तसेच खासगी आस्थापनांना बनावट इमेल आयडीवरून गंडा घालण्यात आल्याचे गुन्हे घडले.
डेटिंग अॅपवरून मैत्री करून अत्याचाराच्याही घटना घडल्या आहेत. तसेच अश्लील फोटो व व्हिडीओ तयार करून ते प्रसारीत केल्याचेही प्रकार आहेत. ओळखीच्या व्यक्ती किंवा नातेवाईकांकडून असे प्रकार होण्याचे प्रमाण जास्त आहे. फेसबुकवरूनही अशा पद्धतीने बालकांचे फोटो अपलोड करण्यात आल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हे दाखल झाल्यानंतर पुढे काय?
कंपन्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने पैसे परत मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार परदेशातील बॅंकांच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांना थांबवून तक्रारदारांचे लाखो रुपये परत मिळविण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्यांच्या नावे बनावट अकाऊंट
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार केल्याचे प्रकार उघडकीस आले. या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांच्या फेसबुकवरील फ्रेंडला रिक्वेस्ट पाठविण्यात येते. त्यानंतर पैशांची मागणी करण्यात येते.
सोशल मीडियाचा वापर केल्याप्रकरणी दाखल गुन्हे
२०१९ - ३६
२०२० - ४४
कुठल्या महिन्यात सर्वाधिक गुन्हे (२०२०)
महिना गुन्हे संख्या
जानेवारी - ७
फेब्रुवारी - १२
मार्च - ७
एप्रिल - ००
मे - ००
जून - ३
जुलै - ४
ऑगस्ट - ००
सप्टेंबर - २
ऑक्टोबर - ६
नोव्हेंबर - ३
डिसेंबर - ००