भर बाजारात मानवी बॉम्बनं पतीनं पत्नीला उडवलं; ह्दयद्रावक घटनेने सगळेच हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 12:33 PM2021-10-06T12:33:25+5:302021-10-06T12:35:18+5:30
आरोपी रोहमिंगालियाना अचानक महिलेच्या दुकानाजवळ आला त्याने सिगारेट रोल करण्यास सुरूवात केली.
आइजॉल – म्यानमार आणि बांग्लादेश सीमेजवळील मिझोरमच्या लुंगलेई शहरात एका बॉम्ब स्फोटाने खळबळ माजली आहे. प्रथम दर्शनी हा स्फोट दहशतवादी कृत्य असल्याचा संशय घेत सुरक्षा यंत्रणांनी शहरात अलर्ट घोषित केला. परंतु या प्रकरणाला आता घरगुती वादाचं वळण लागल्याने सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. प्रेमभंग झालेल्या पतीने स्वत:च्या पत्नीला जीवघेणी हल्ल्यात उडवलं आहे.
याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलंय की, बॉम्बस्फोटात मृत पावणारे दोघेही वृद्ध होते. आरोपीची ओळख ६२ वर्षीय रोहमिन्गलियाना अशी झाली आहे. तर महिला ६१ वर्षीय तलांग थियांगलिमी असं नाव आहे. आरोपी हा महिलेचा दुसरा पती होता. परंतु १ वर्षापासून दोघंही वेगवेगळे राहत होते आणि काही महिन्यापूर्वी महिलेने आरोपीसोबत घटस्फोट घेतला होता. स्फोट झालेला परिसरात भरबाजार होता. महिला या बाजारात भाजी विकण्याचं दुकान चालवते. तिची मुलगीही जवळच दुकान चालवते.
प्रत्यक्षदर्शीच्या मते, आरोपी रोहमिंगालियाना अचानक महिलेच्या दुकानाजवळ आला त्याने सिगारेट रोल करण्यास सुरूवात केली. तेव्हा महिलेने त्याला विरोध केला. त्यानंतर आरोपीने सिगारेट जाळली आणि तब्येत खराब होऊन चक्कर येत असल्याचं बोलू लागला. काही कळणार इतक्यातच आरोपीने महिलेला मिठी मारली आणि ट्रिगर दाबलं. अचानक झालेल्या घटनाक्रम आणि स्फोटाच्या आवाजाने सगळेच घाबरले. महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर आरोपीला जखमी अवस्थेत हॉस्पिटलला उपचारासाठी नेले. मात्र त्याठिकाणी आरोपीने अखेरचा श्वास घेतला.
याआधीही घटस्फोट झाला होता परंतु...
ही घटना पूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. दोन्ही मृतकाच्या घरच्यांचे म्हणणं आहे की, आरोपी पतीचा हिंसक स्वभाव होता. घरगुती वादातून अनेकदा पतीने पत्नीला मारहाण केली होती. मिझोरममध्ये याआधीही पती-पत्नीचा वाद असलेल्या घटना समोर आल्या होत्या. परंतु कुणीही आजतागायत अशी घटना ऐकली नाही. या घटनेबाबत एसपी वनछावन्न यांनी स्पष्ट केले आहे की, या स्फोटात जिलेटिनचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी आयपीसी कलम ३०२, सीआरपीसी कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.