आमदार अब्बास अन्सारी जेलमध्ये, रोज तीन तास पत्नी निखतसोबत रंगरलिया; छापा पडताच...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 05:46 PM2023-02-11T17:46:16+5:302023-02-11T17:47:08+5:30
Crime News: अब्बासला जेलमध्ये हायफाय सेवा दिली जात होती. त्याची पत्नी निखत बानो त्याला भेटण्यासाठी कोणतीही वेळ, परवानगी लागत नव्हती.
चित्रकूटच्या तुरुंगात तेव्हा मोठी खळबळ उडाली जेव्हा आमदार अब्बास अन्सारी त्याच्या पत्नीसोबत जेलमध्ये रंगरलिया करत होता आणि जिल्हाधिकारी, एसपींचा छापा पडला. अब्बास आणि त्या पत्नी निखत हे दोघे दररोज जेलरच्या खोलीत भेटत होते. जेव्हा छाप्यात रुम उघडली गेली तेव्हा निखत रुममध्ये सापडली. तिच्याकडून पैसे, मोबाईल आणि अवैध वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. निखतला अटक करण्यात आली आहे.
पोलिस एएसआयने दिलेल्या माहितीनुसार, बांदा तुरुंगात बंद असलेला कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बास अन्सारी हा मऊ मतदारसंघाचा आमदार आहे. तो चित्रकूट तुरुंगात बंद आहे. अब्बासची पत्नी निखत बानो ही गेल्या अनेक दिवसांपासून दररोज सकाळी ११ वाजता कारागृहात येत होती व ३-४ तास सोबत घालवून परत जात होती, अशी खबऱ्याने टीप दिली.
अब्बासला जेलमध्ये हायफाय सेवा दिली जात होती. त्याची पत्नी निखत बानो त्याला भेटण्यासाठी कोणतीही वेळ, परवानगी लागत नव्हती. अब्बास याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. चित्रकूट तुरुंगात असताना अब्बासने आपल्या पत्नीचा मोबाईल फोन वापरून साक्षीदार आणि फिर्यादी अधिकाऱ्यांना धमकावले आणि पैशांची मागणीही केली होती. तुरुंगातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या भेटवस्तू, पैसे आणि प्रलोभने दिली गेली होती. यामुळे त्याची पत्नी आरामात तुरुंगात काही तास घालवत होती.
यासाठी अब्बासची वेगळी सोयही करण्यात आली होती. माहिती मिळताच जिल्हादंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी साध्या वेशात कारागृहात अचानक भेट दिली. अब्बास त्याच्या बॅरेकमध्ये दिसला नाही. तुरुंग अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी छाप्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची दिशाभूल केली. तुरुंग अधिकाऱ्यांना कडक शब्दात विचारले तेव्हा एका तुरुंग कर्मचाऱ्याने पोलखोल केली. अब्बास त्याची पत्नी निखतसोबत जेलरच्या ऑफिसजवळच्या खोलीत असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी बंद खोली उघडली असता, खोलीत केवळ निखत दिसून आली. या काळात अब्बासला त्या खोलीतून बाहेर काढण्यात आले होते.
निखत बानोची झडती घेतली असता 2 मोबाईल आणि सोन्यासारख्या धातूच्या दोन अंगठ्या, 2 नोज पिन, दोन बांगड्या, दोन चेन आणि 21 हजार रुपयांच्या रोख रकमेसह 12 रियाल (परकीय चलन) जप्त करण्यात आले. निखतकडून जप्त केलेला मोबाईल तपासण्यात आला. परंतू तोवर तिने त्यांतील डेटा नष्ट केला होता. पोलिसांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी तिने दिली. अखेर निखतला अटक करण्यात आली आहे. याचसोबत जेलर आणि अन्य अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.