आमदार कारेमाेरेंना अटक व जामीन; ३१ डिसेंबरचे पोलीस ठाण्यातील शिवीगाळ प्रकरण भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 08:41 AM2022-01-04T08:41:04+5:302022-01-04T08:41:10+5:30
३१ डिसेंबरच्या रात्री दाेन व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी आमदार कारेमाेरे माेहाडी ठाण्यात गेले हाेते. त्याठिकाणी त्यांनी प्रचंड गाेंधळ घालत पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/मोडाडी : माेहाडी ठाण्यात गाेंधळ घालून पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुमसरचे आमदार राजू कारेमाेरे यांना साेमवारी दुपारी भंडारा येथे अटक करण्यात आली. मोहाडी न्यायालयापुढे हजर केले असता १४ दिवसाची न्यायालयीन काेठडी सुनावली. सायंकाळी जिल्हा न्यायालयाने त्यांना जामीन दिला.
३१ डिसेंबरच्या रात्री दाेन व्यापाऱ्यांना मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी आमदार कारेमाेरे माेहाडी ठाण्यात गेले हाेते. त्याठिकाणी त्यांनी प्रचंड गाेंधळ घालत पाेलिसांना अश्लील शिवीगाळ केली. या शिवीगाळीचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला. दरम्यान, रविवारी पत्रकार परिषद घेत या प्रकाराबद्दल त्यांनी माता-भगिनींची माफीही मागितली हाेती. साेमवारी भंडारा येथे चाैकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. मोहाडी न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर जिल्हा न्यायालयात तात्काळ जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला. त्यावर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. त्यामुळे त्यांची सुटका झाली.
तगडा पाेलीस बंदाेबस्त
न्यायालय परिसरात तगडा पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला आहे. माेहाडी ठाण्यासमाेर नागरिकांची माेठी गर्दी झाली हाेती. ही कारवाई पाेलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. भंडारा ठाण्यात उपविभागीय पाेलीस अधिकारी संजय पाटील, उपविभागीय पाेलीस अधिकारी रिना जनबंधू यांच्यासह मोठा फौजफाटा हाेता.