आमदार संजय सावकारेंची कार केंद्रीय मंत्र्यांच्या नावावर करण्याचे कारस्थान; आरटीओची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 06:39 AM2022-01-02T06:39:54+5:302022-01-02T06:40:12+5:30
Crime News RTO: आरटीओ कार्यालयातील एका अधिकाऱ्याला अडचणीत आणण्यासाठी हे षडयंत्र रचल्याची चर्चा असून याआधीदेखील तसा प्रयत्न झालेला आहे.
सुनील पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आमदार संजय सावकारे यांची कार परिवहन मंत्र्यांच्या नावावर हस्तांतरण करण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवरून आमदार सावकारे यांचा मोबाईल नंबर काढून त्या जागी जो दुसरा नंबर अपलोड करण्यात आला आहे. तो नंबर जळगावातीलच अशोक नावाच्या एजंटाचा असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, या प्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे.
परिवहनच्या पोर्टलवर गुजरातमधून सावकारे यांचा नंबर काढून त्या जागी दुसरा नंबर टाकल्याचे उघड झाले आहे. आरटीओ कार्यालयातील एका अधिकाऱ्याला अडचणीत आणण्यासाठी हे षडयंत्र रचल्याची चर्चा असून याआधीदेखील तसा प्रयत्न झालेला आहे. अधिकारी, कर्मचारी व काही एजंट यांच्यात अनेक दिवसांपासून संबंध ताणले गेले आहेत.
कार ब्लॅकलिस्ट
हा प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासनाने सावकारे यांची कार तातडीने ब्लॅकलिस्ट केल्याचे समजते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला त्या वाहनाची माहिती मिळवता येणार नाही. दरम्यान, सावकारे यांच्या कारवरील कर्जाचा बोझा कमी करण्याचे प्रकरण आधी सादर करण्यात आले. त्यानंतर हस्तांतरणाचा उल्लेख करण्यात आला आहे, असे अंतर्गत चौकशीत समोर आले आहे.