पेट्रोल पंपवाल्यानं आमदारालाच गंडवलं; ५१ लीटर डिझेलमध्ये केवळ ५०० मीटर गाडी चालली, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 05:02 PM2021-09-08T17:02:36+5:302021-09-08T17:04:38+5:30
पेट्रोल पंपावर फसवणुकीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. यात ज्याची फसवणूक झाली तो सामान्य व्यक्ती नव्हे तर त्या परिसरातील आमदार आहे
मोतिहारी – एकीकडे दिवसेंदिवस वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दराने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोलच्या दराने तर शंभरी पार केली आहे. सरासरी १०५ रुपये प्रति लीटर पेट्रोलचा दर आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी अनेकदा आंदोलनं केली परंतु भाववाढ कमी होण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. अशात पेट्रोप-डिझेल विक्री पंपावर लोकांना फसवण्याचे प्रकारही अधूनमधून समोर येतात. आता तर आमदारालाच गंडवल्याचं उघड झालं आहे.
बिहारच्यापेट्रोल पंपावर फसवणुकीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. यात ज्याची फसवणूक झाली तो सामान्य व्यक्ती नव्हे तर त्या परिसरातील आमदार आहे. बिहारच्या सिकटा मतदारसंघातून निवडून आलेले भाकपाचे आमदार पेट्रोल पंपावरील फसवणुकीला बळी पडले आहेत. आमदारांनी स्कोर्पिओ गाडीत ५१ लीटर डिझेल भरलं परंतु त्यानंतर जे घडलं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. डिझेल भरल्यानंतर अवघ्या ५०० मीटर अंतरावर गेल्यावर आमदाराची गाडी बंद पडली.
ही घटना माँ विध्वासनी सर्व्हिस सेंटरजवळ घडली. आमदार सिकटा येथून पटना येथे कृषी विभागाच्या बैठकीसाठी चालले होते. त्यावेळी रस्त्यात चंपारण जिल्ह्यानजीक स्कोर्पिओतील डिझेल संपण्याच्या मार्गावर होते. त्यानंतर तात्काळ राष्ट्रीय महामार्ग २८ वरील पेट्रोल पंप मेसर्स माँ विध्वासनी सर्व्हिस सेंटर येथे त्यांनी गाडी वळवली. याठिकाणी आमदारांनी गाडीत ५१.१२ लीटर डिझेल भरलं आणि ४ हजार ८८२ रुपये बिल भरून पेट्रोल पंपावर पुढे गेले. त्यानंतर अवघ्या ५०० मीटरवर आमदारांची गाडी बंद पडली.
गाडीत डिझेल फुल असून गाडी चालू होत नसल्याने हैराण झालेल्या आमदाराने जवळील एका मॅकेनिकाला बोलावून गाडी चेक केली. त्यावेळी गाडीच्या टाकीत तेलाऐवजी केवळ पाणी असल्याचं आढळलं. त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी मेहसी पोलीस ठाण्यात जाऊन रितसर तक्रार केली. आमदार विरेंद्र प्रसाद गुप्ता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासलं असतं.आमदार विरेंद्र गुप्ता यांच्या गाडीत डिझेलयुक्त पाणी असल्याचं समोर आलं. त्यानंतर आमदाराच्या गाडीतून सगळं डिझेल काढून जप्त करत पेट्रोल पंपाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र घडलेल्या प्रकारामुळे सध्या सिकटा इथं हे प्रकरण चर्चेचा विषय बनलं आहे.