मनसेच्या उपशहर प्रमुखाचे मारेकरी सापडले; चारही आरोपींना अवघ्या दोन तासात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 10:45 PM2020-10-28T22:45:56+5:302020-10-28T22:46:46+5:30
MNS murder: नाकाबंदी वेळी गाडीची झडती घेतली असता हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे त्या गाडीत सापडली आहेत.
अंबरनाथ: मनसेचे उपशहर प्रमुख राकेश पाटील यांचे हत्या करून पळून जाणार या चारही आरोपींना मुरबाड पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान अटक केली आहे.
अवघ्या दोन तासात चारही आरोपी अटकेत असून इतर आरोपींचा देखील पोलीस शोध घेत आहेत. हे चारही आरोपी राकेश पाटील यांची हत्या करून मुरबाडच्या दिशेने पळून जात होते, त्याच दरम्यान वायरलेस वरून मिळालेल्या माहितीनुसार मुरबाड पोलिसांनी मुख्य हायवेवर नाकाबंदी लावली होती. नाकाबंदी लावलेली असताना संशयास्पद स्कॉर्पिओ कार जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी ती गाडी अडवित त्यांच्याकडे चौकशी केली.
गाडीची झडती घेतली असता हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे त्या गाडीत सापडले आहेत. राकेश पाटील यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्र मध्ये चॉपर आणि एका रॉडचा समावेश आहे. मुरबाड पोलिसांनी या चारही आरोपींना अटक करून अंबरनाथ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान या हत्येप्रकरणात अंबरनाथ मधील एका बडा बांधकाम व्यावसायिकाच्या सहकार्याचे नाव देखील येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राकेश पाटील यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने प्रभागात चांगले काम देखील सुरु होते. अंबरनाथ गांव आणि परिसरात नव्याने विकसीत झालेल्या इमारतींना भेडसावरणा-या समस्यांवर त्यांचे चांगले काम देखील सुरु होते. नव्याने विकसित होत असलेल्या वस्तीकडे पालिकेचे आणि बांधकाम व्यवसायीकांचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड त्यांची होती. या सोबतच त्यांचा या भागातिल नागरिकांसोबत चांगले संबंध निर्माण झाले होते. बुधवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान पाटील हे अंबरनाथ गांव आणि पाले गांव यांच्या मध्यावर नव्याने विकासीत झालेल्या संकुलाजवळ कामानिमित्त गेलेले असतांना चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारधार शस्त्रने हल्ला चढविला. पाटील यांनी त्यांचा प्रतिकार देखील करण्याचा प्रयत्न केला. मात्र या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यांना लागलीच रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकाराची माहिती गावात कळताच गावातील वातावरण तंग झाले आहे.