सहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या मनसेच्या उपशहर अध्यक्षाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 11:11 PM2019-02-08T23:11:51+5:302019-02-08T23:17:12+5:30
झाडाच्या फांद्या छाटल्याने कारवाईची धमकी देऊन सहा लाखाची खंडणी मागणाऱ्या पनवेलच्या मनसे उपशहर अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबई - झाडाच्या फांद्या छाटल्याने कारवाईची धमकी देऊन सहा लाखाची खंडणी मागणाऱ्या पनवेलच्या मनसे उपशहर अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. गेली एक महिन्यापासून तो तक्रारदाराला खंडणीसाठी धमकावत होता. अखेर गुरुवारी संध्याकाळी सापळा रचून त्याला खंडणीची रक्कम स्विकारताना अटक करण्यात आली.
मिलिंद खाडे असे पोलिसांनी अटक केलेल्या मनसे उपशहर अध्यक्षाचे नाव आहे. कामोठे येथील रहिवाशी धर्मा जोशी यांना तो एक महिन्यापासून खंडणीसाठी धमकावत होता. जोशी हे सिडकोचे निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी घराच्या बांधकामात आड येणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडल्या होत्या. याप्रकरणी पालिकेकडे तक्रार करून कारवाई टाळण्यासाठी मिलिंद खाडे याने जोशी यांच्याकडे सहा लाख रुपयांची मागणी होती. तसेच मनसे स्टाईल ने कारवाईची धमकी देत सोशल मीडियावर त्यांची बदनामी करत होता. त्यामुळे जोशी यांनी त्याच्याविरोधात गुन्हे शाखा उपायुक्त तुषार दोशी यांच्याकडे तक्रार केली .
त्यानंतर खंडणी विरोधी पथक त्याच्यावर पाळत ठेवून होते. यावेळी खाडे याने तडजोड करून साडेपाच लाख रुपये स्वीकारायची तयारी दाखवली. त्यापैकी अडीच लाखाचा पहिला हप्ता घेण्यासाठी तो कामोठे येथे येणार होता. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार यांच्या मागर्दर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश वाघमारे, सहायक फौजदार शेखर तायडे, सतीश भोसले, अनिल कदम, सूर्यभान जाधव, भास्कर कुंभार, राजेंद्र सोनावणे यांनी सापळा रचला होता. यावेळी त्याठिकाणी आलेल्या खाडे याने जोशी यांच्याकडून रक्कम घेऊन चलाखीने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता, सापळा रचून बसलेल्या खंडणी विरोधी पथकाने त्याला अटक केली. त्याच्याविरोधात कामोठे पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पनवेल न्यायालयाने त्याला ११ फेब्रुवारी पर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे.