मनसेच्या पदाधिकाऱ्याने उल्हासनगर प्रांत अधिकाऱ्याच्या गाडीवर केला हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 08:13 PM2020-11-24T20:13:34+5:302020-11-24T20:14:28+5:30
Crime News : मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी प्रांत अधिकारी यांच्या गाडीवरील हल्ल्याचा निषेध केला असून पक्षश्रेष्ठी पुढील निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर : प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या गाडीवर मनसे विभाग प्रमुख योगीराज देशमुख यांनी दुपारी दगडाने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. सरकारी आरक्षित भूखंडावर बांधकाम होत असल्याच्या तक्रारींची दखल न घेतल्याने, ही कृती केल्याची कबुली देशमुख यांनी दिली. तर देशमुख कोरोना काळात भेटले नसून त्यांच्या तक्रारी प्रलंबित नसल्याची प्रतिक्रिया गिरासे यांनी पत्रकारांना दिली आहे.
उल्हासनगर प्रांत कार्यालय प्रांगणात उभ्या असलेल्या प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या गाडीवर मनसे विभाग प्रमुख योगीराज देशमुख यांनी दुपारी दगडाने हल्ला केला. हल्ल्यात गाडीची काच फुटली आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून याविरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे संकेत प्रांत अधिकारी गिरासे यांनी दिली. दरम्यान योगीराज देशमुख यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून यामध्ये राज्य शासनाच्या आरक्षित भूखंडावर शासनाचा नाम फलक लावला असताना अवैध बांधकाम सुरू आहेत. अशी तक्रार प्रांत कार्यालयाकडे केली. मात्र या तक्रारीकडे प्रांत अधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत असून मला कार्यालयात येण्यास मज्जाव केल्याचे व्हिडीओत म्हटले. मंगळवारी याबाबत विचारणा करण्यासाठी प्रांत कार्यालयात गेल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यानिषेधार्थ प्रांत अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला केल्याची कबुली दिली आहे.
प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी मात्र योगीराज यांचे आरोप फेटाळून गेल्या कोरोना काळात आपल्याकडे आलेच नाही. तसेच त्यांचे कोणतेही अर्ज अथवा तक्रार प्रलंबित नसल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र योगीराज देशमुख यांच्या हल्ल्याने, प्रांत कार्यालयातील कारभारावर टीकेची झोळ उठली आहे. प्रांत कार्यालयाने शहरातील खुल्या जागा, विविध शासकीय कार्यालयाच्या जागेवर सनद दिल्याने, त्या वादात सापडल्या असून याबाबत प्रांत कार्यालयावर गेल्या वर्षी राजकीय पक्ष व सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला होता. तसेच दिलेल्या सनदेच्या चौकशीची मागणी केली होती. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी प्रांत अधिकारी यांच्या गाडीवरील हल्ल्याचा निषेध केला असून पक्षश्रेष्ठी पुढील निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहे.
योगीराज देशमुख यांना अटक
प्रांत अधिकारी यांच्या गाडीवरील हल्ल्याचा शहरातून निषेध व्यक्त होत असून प्रांत अधिकारी यांच्या तक्रारीवरून योगीराज देशमुख यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त डी टी टेळे यांनी दिली आहे.