गो-तस्करीच्या आरोपावरून मध्य प्रदेशात जमावाचा हल्ला; महाराष्ट्रातील एक जण मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 07:03 AM2022-08-04T07:03:13+5:302022-08-04T07:03:23+5:30
नर्मदापुरमचे पोलीस अधीक्षक गुरकरन सिंह यांनी सांगितले की, मंगळवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास सिवनी मालवा शहराजवळ बाराखड गावात गायींना घेऊन जाणारा एक ट्रक रोखण्यात आला होता.
नर्मदापुरम (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम जिल्ह्यात गो-तस्करीच्या आरोपावरून एका जमावाने केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नर्मदापुरमचे पोलीस अधीक्षक गुरकरन सिंह यांनी सांगितले की, मंगळवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास सिवनी मालवा शहराजवळ बाराखड गावात गायींना घेऊन जाणारा एक ट्रक रोखण्यात आला होता. त्यातून तीन जण गायींची बेकायदा वाहतूक करीत होते. १०-१२ लोकांच्या जमावाने ट्रक रोखून तीन जणांना बेदम मारहाण केली. त्यात तिघे जखमी झाले. पोलिसांनी तिघांना रुग्णालयात नेले. तेथे एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात येईल, असे ते म्हणाले. गायींची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो जखमी झालेला आहे. नजीर अहमद असे मृताचे नाव असून, शेख लाला व मुश्ताक अशी जखमींची नावे आहेत. (वृत्तसंस्था)
चालकाचा दावा...
शेख लाला हा ट्रक चालवत होता. त्याने सांगितले की, नर्मदापुरम जिल्ह्यातील नांदेरवाडा गावातून गायी अमरवतीमध्ये नेत असताना गावकऱ्यांनी वाहन रोखले. गायी कत्तलीसाठी नेल्या जात असल्याचा त्याने इन्कार केला व गायी बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले. त्याच्या ट्रकमध्ये ३० गायी आहेत, असेही त्याने सांगितले.