रोहकल येथे कंपनीत घुसून जमावाकडून कामगारांना मारहाण,वाहनांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 02:07 PM2018-11-17T14:07:56+5:302018-11-17T14:08:35+5:30
टीसीआय कंपनीत जबरदस्तीने घुसून एकत्र येत तुम्ही येथे काम करायचे नाही म्हणत तेथील कामगारांना शिवीगाळ, दमदाटी करून काठ्यांनी मारहाण केली.
चाकण : रोहकल (ता.खेड ) येथील टीसीआय कंपनीत जबरदस्तीने घुसून, संगनमत करून, बेकायदा जमावाने एकत्र येत तुम्ही येथे काम करायचे नाही म्हणत तेथील कामगारांना शिवीगाळ, दमदाटी करून काठ्यांनी मारहाण केली. तसेच दमदाटी व दहशत करून वाहनांची तोडफोड करून या कामगारांना कंपनीतून बाहेर काढले. या प्रकरणी १६ जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी १६ नोव्हेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास रोहकल गावच्या हद्दीतील टीसीआय कंपनीत घडली. याबाबत भिवाजी महादेव वाटेकर (वय ६४, रा. काळुस, वाटेकरवाडी, ता.खेड, जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संग्राम सर्जेराव पाटील (रा. आंबेगाव ), रुपेश शंकरराव म्हाशाळकर (रा. वडगाव मावळ ), यशपाक राकीसन चौधरी ( रा.निगडी ), राजू ज्ञानदेव भानुसरे ( रा. शिलाटणे ), मंिच्छद्र शिवराम मोहिते (रा. वडगाव मावळ ), संग्राम किसन भानुसरे (रा. शिलाटणे ), विलास जयराम साबळे ( रा. वडगाव मावळ ), कृष्णा संपत पवार ( रा. वडगाव मावळ ), अविनाश नितीन म्हाशाळकर, विनायक बजरंग मोडवे, शिवानंद मारुती कटनाईक, नवनाथ मारुती शिवेकर, प्रदीप नारायण कड, किरण राजाराम पवार, बालाजी रामू पवार (सर्व रा. वडगाव मावळ ), देविदास कैलास देवकाते ( रा. चिंचवड ) या सोळा जणांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पासलकर हे पुढील तपास करत आहेत.