महिलेची छेड काढणाऱ्या सराईत गुन्हेगाराची जमावाकडून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 10:29 AM2018-10-14T10:29:09+5:302018-10-14T10:40:57+5:30
महिलेची छेडछाड केल्याची पोलिसांकडे तक्रार दिल्याचे समजल्यानंतर त्यांच्या घरावर दगडफेक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जमावातील ३ ते ४ जणांनी मारहाण करुन त्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार वानवडीत शनिवारी रात्री घडला.
पुणे - महिलेची छेडछाड केल्याची पोलिसांकडे तक्रार दिल्याचे समजल्यानंतर त्यांच्या घरावर दगडफेक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जमावातील ३ ते ४ जणांनी मारहाण करून त्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार वानवडीत शनिवारी रात्री घडला. अक्षय सोनावणे (वय २८, रा़ दरोडे वस्ती, वानवडी) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, अक्षय सोनवणे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी, मारामाऱ्याचे गुन्हे दाखल आहेत. शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास तो महंमदवाडी येथील राजीव गांधी कॉलनीमध्ये गेला होता. दारुच्या नशेत त्याने तेथील एका महिलेशी वादावादी केली. त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे या प्रकाराची तक्रार दिली. ही गोष्ट अक्षय या समजल्यानंतर तो रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा राजीव गांधी कॉलनीत गेला. त्याने या महिलेच्या घरावर दगडफेक केली. तेथे पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. यावेळी चिडलेल्या जमावाने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो त्यांनाही शिवीगाळ करुन लागल्याने त्यातील ३ ते ४ जणांनी त्याला मारहाण केली. त्यात तो जबर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अक्षय सोनावणे याला तातडीने ससून रुग्णालयात नेले़ परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता.
अक्षय सोनवणे हा बाल गुन्हेगार असून त्याच्यावर तेव्हा ११ गुन्हे दाखल होते. त्यानंतर आता त्याच्यावर ७ गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी वानवडी पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्याकडून दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले होते. नुकताच तो त्यातून सुटून आला होता. त्याच्या आईचे त्याच्या लहानपणीच निधन झाले असून, वडिलांनी दुसऱ्या विवाह केला आहे. त्या व्हाईटनरचे व्यसन आहे. दारु पिणे, व्हाईटनर ओढल्यानंतर तो कोणाचेच ऐकत नाही.
शनिवारी दुपारी तो मोटारसायकलवरुन जात असताना त्याचा एका महिलेशी वाद झाला. त्याची तक्रार त्या महिलेने पोलिसांना दिली. तेव्हा तो जवळच्या जंगलात पळून गेला होता. नशेत तो रात्री परत आला व त्या महिलेच्या घरावर दगडफेक करु लागला. तेव्हा जमलेल्या नागरिकांनी त्याला बांबु, काठ्याने मारहाण केली. त्याच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला.
नागपूरमध्ये अशाच प्रकारची घटना यापूर्वी घडली होती. संतप्त जमावाने एका सराईत गुन्हेगाराला भर दिवसा रस्त्यावर मारहाण करुन त्याची हत्या केली होती. त्यानंतर पुण्यात असा प्रकार घडला आहे.