मोबाइल ॲप कंपन्यांचा पर्दाफाश; ईडीकडून कार्यपद्धती उघड, १०५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 08:04 AM2022-08-04T08:04:44+5:302022-08-04T08:04:58+5:30

मोबाइल ॲपच्या माध्यमातून कर्ज देणाऱ्या कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांचे पैसे असल्याची बाब उजेडात आल्यानंतर ईडीने यामध्ये तपास सुरू करत देशभरातील सुमारे ६०० कंपन्यांना जून महिन्यात नोटिसा जारी केल्या होत्या.

Mobile app companies exposed by ED who giving loan, its china's companies | मोबाइल ॲप कंपन्यांचा पर्दाफाश; ईडीकडून कार्यपद्धती उघड, १०५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

मोबाइल ॲप कंपन्यांचा पर्दाफाश; ईडीकडून कार्यपद्धती उघड, १०५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ग्राहकांना ७ ते ३० दिवसांसाठी छोट्या रकमेचे कर्ज देत त्यांना ब्लॅकमेल करत दामदुपटीने पैसे वसूल करणाऱ्या मोबाइल ॲप कंपन्यांची कार्यपद्धती ईडीने केलेल्या कारवाईतून उघड झाली असून, या संदर्भात ईडीने १२ बिगर बँकिंग वित्तीय संस्थांची २३३ बँक खात्यात पडून असलेली १०५ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. 

मोबाइल ॲपच्या माध्यमातून कर्ज देणाऱ्या कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांचे पैसे असल्याची बाब उजेडात आल्यानंतर ईडीने यामध्ये तपास सुरू करत देशभरातील सुमारे ६०० कंपन्यांना जून महिन्यात नोटिसा जारी केल्या होत्या. या नोटिशीद्वारे या कंपन्यांना त्यांची कार्यपद्धती, पैशाचा स्रोत, आर्थिक व्यवहार यांची माहिती देण्यास सांगण्यात आले होते. या चौकशीदरम्यान अनेक कंपन्यांचे व्यवहार संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर ईडीने या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास  सुरुवात केली आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या लोकांना आतापर्यंत दुप्पट किंवा चौपट व्याजदराने पैसे परत करावे लागले आहेत. तर अनेक वेळा कर्ज घेतलेल्या ग्राहकांना ब्लॅकमेल करण्याच्याही घटना पुढे येत आहेत. 

काय आहे कार्यपद्धती ?
 कर्जाचे वितरण हे बिगरबँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून होते आणि त्याकरिता आपण केवळ तांत्रिक सहकार्य  देत असल्याचा दावा आजवर मोबाइल ॲप कंपन्या करत होत्या. 
 प्रत्यक्षात या कंपन्यांनी चीनकडून आलेला पैसा देशातील काही बंद पडलेल्या, मात्र ज्यांचा वित्तीय व्यवहारांचा परवाना शाबूत आहे, अशा बिगरबँकिंग वित्तीय संस्थाशी संधान बांधत त्यांच्याकडे फिरवला. तसेच, स्वतःचे ॲप विकसित करत या ॲपच्या माध्यमातून लोकांना कर्ज देण्यास सुरुवात केली. या आर्थिक व्यवहारांकरिता रिझर्व्ह बँकेची कोणत्याही प्रकारे परवानगी अथवा परवाना घेतला नव्हता.
 मोबाइल ॲप कंपन्या एवढ्यावर थांबल्या नाहीत तर त्यांनी ॲपची तांत्रिक रचना अशा पद्धतीने केली की, ज्यावेळी एखादी व्यक्ती ॲप डाऊनलोड करेल, त्यावेळी त्याच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांक, ग्राहकांच्या मोबाइल फोटो गॅलरीमधील फोटो अशी सर्व माहिती या कंपन्यांना मिळू शकेल. यामुळेच कर्जाची परतफेड करूनही ग्राहकांना ब्लॅकमेलला सामोरे जावे लागले. 
 या ग्राहकांकडून कर्जावरील भरमसाट व्याजापोटी मिळालेले पैसे या कंपन्यांनी पुन्हा चीनमधील कंपन्यांकडे वळवल्याचेही ईडीच्या तपासात दिसून आले आहे.
 अशा पद्धतीच्या व्यवहारांत मोबाईल ॲप कंपन्यांना घसघशीत पैसे मिळाले तर बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांना यासाठी काही कमिशन प्राप्त झाले.
 कोणत्या कर्जासाठी किती प्रक्रिया शुल्क आकारायचे, किती व्याजदर आकारणी करायची, याचे सारे निर्णय चीन कंपन्याच घेत असल्याचेही ईडीच्या तपासात उघड झाले.

आकडे
ईडीने बुधवारी कारवाई केलेल्या १२ बिगरबँकिंग वित्तीय संस्थांनी आतापर्यंत ४४३० कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण मोबाईल ॲपच्या माध्यमातून केले आहे.
या वितरित झालेल्या कर्जावर या कंपन्यांनी ८१९ कोटी रुपयांचे व्याज कमावले आहे.

ईडीच्या तपासात आजवर या कंपन्यांची २३३ बँक खाती सापडली असून यातील १०५ कोटी रुपये ईडीने जप्त केले आहेत.
या प्रकरणी ईडीने आणखी ४ बिगरबँकिंग वित्तीय संस्थांना कारणे दाखवा नोटिसा जारी केल्या असून त्या कंपन्यांचे व्यवहार हे १५८ कोटी ९७ लाख रुपयांचे आहेत.
यापूर्वी देखील काही मोबाइल ॲप  कंपन्यांवर ईडीने कारवाई केली होती. बुधवारी केलेल्या कारवाईनंतर आता जप्तीचा आकडा २६४ कोटी ३० लाख रुपये इतका झाला आहे. 

Web Title: Mobile app companies exposed by ED who giving loan, its china's companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.