मोबाईल गेमने घेतला विद्यार्थ्याचा बळी, पोलिसाच्या मुलाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 08:50 PM2020-07-20T20:50:00+5:302020-07-20T20:52:06+5:30
पोलीस पुत्राने लावला गळफास : गिट्टीखदानमध्ये खळबळ
नागपूर : मोबाईल गेमच्या नादी लागलेल्या एका शाळकरी मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. राजवीर नरेंद्र ठाकूर असे मृत मुलाचे नाव असून तो सातव्या वर्गाचा विद्यार्थी होता. १३ वर्षीय राजवीरचे वडील नरेंद्र ठाकूर हे गुन्हे शाखेत वाहनचोरी प्रतिबंधक पथकात कार्यरत आहेत. त्यांचे गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनंतनगरात स्वतःचे घर आहे. खाली आई-वडिल आणि भाऊ राहतो. तर पहिल्या माळ्यावर ते पत्नी मुलगी आणि राजवीर असे चौघे राहायचे.
शाळेत अत्यंत हुशार विद्यार्थी समजला जाणारा राजवीर अभ्यासापासून व्यायामापर्यंत सर्वच स्वयंस्फूर्तीने करत होता. ऑनलाईन क्लासेस सुरू झाल्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्याला वडिलांनी अभ्यासाची कीट आणि आयपॅड घेऊन दिला होता. आयपॉड घेतल्यापासून तो जास्तीत जास्त वेळ त्यात गुंतून राहत होता. अभ्यास करत आहे, असे समजून आई वडील त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. आज सकाळी ७ च्या सुमारास त्याची आई त्याच्या अभ्यासाच्या रूममध्ये आली असता राजवीर खिडकीच्या बाजूला गळ्यात फास टाकून उभा असल्याचे दिसले. त्यामुळे आईने आरडाओरड केली. ती ऐकून खाली राहणारे नातेवाईक, शेजारी धावून आले. राजवीरला तातडीने जवळच्या डॉक्टरकडे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, ही घटना माहीत होताच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी ठाकूर यांच्या निवासस्थानी गर्दी केली. राजवीर हा अत्यंत हुशार समजला जात होता. त्याने हे आत्मघातकी कृत्य केल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
स्टंटबाजीने केला घात
राजवीर याने त्याच्या स्टडी रुमच्या खिडकीला ओढणी बांधली. गळ्यात फास टाकून घेतला. तोंडावर पिलो कव्हरही घालून घेतले. त्यानंतर त्याने पलंगावरून खाली उडी मारली असावी. विशेष म्हणजे, खिडकी आणि राजवीरची उंची सारखीच आहे.त्यामुळे तो जमिनीवर उभा असल्यासारखा दिसत होता, असे सांगितले जाते. अर्थात त्याने मोबाईल मधील गेममध्ये स्टंट केले जातात, ते करण्याचा प्रयत्न केला असावा आणि गळ्यातील फास आवळला गेल्यामुळे ओढणीची गाठ पक्की झाल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. या घटनेची माहिती कळताच गुन्हे शाखेसह ठिकठिकाणचे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी ठाकूर यांच्या घरी पोहोचले. त्यांनी ठाकूर कुटुंबीयांचे सांत्वन केले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा
Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा
दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या
वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव