गेमिंगसाठी मोबाइल देणे पडले महागात; ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून २२ लाखांची लूट
By मनीषा म्हात्रे | Published: July 19, 2022 10:31 AM2022-07-19T10:31:42+5:302022-07-19T10:32:15+5:30
मैत्रीखातर तरुणांच्या हाती स्वत:चा मोबाईल सोपवणे मात्र ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले.
मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चहा पिण्याच्या निमित्ताने एका ज्येष्ठ नागरिकाची दोन तरुणांशी ओळख झाली. त्याचे रुपांतर मैत्रीत झाले. मैत्रीखातर तरुणांच्या हाती स्वत:चा मोबाईल सोपवणे मात्र ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले. गेमच्या निमित्ताने हाती आलेल्या मोबाईलमधून यूपीआय पिन मिळवत दोघा तरुणांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून तब्बल २२ लाख रुपये लुटल्याचे उघडकीस आले. दोघा तरुणांना दिंडोशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, अधिक तपास सुरू आहे.
बेस्टमधून निवृत्त झालेले प्रकाश नाईक (६८) अंधेरी पूर्वेकडील भागात राहतात. सेवानिवृत्तीचे २० लाख रुपये व इतर जमापूंजी असे सर्व मिळून २६ लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होते. दिंडोशी बस डेपोजवळ पार्क केलेल्या वाहनांची रोज सायंकाळी ५ वाजता पाहणी करणे, हा त्यांचा ठरलेला दिनक्रम. तिथून नजीकच असलेल्या एका इमारतीच्या तळमजल्यावरील चहाच्या टपरीवर नाईक दररोज चहासाठी जातात. तिथेच त्यांची शुभम तिवारी आणि अमर गुप्ता या दोन तरुणांशी ओळख झाली.
ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यातून शुभम कधीकधी गेम खेळण्यासाठी नाईक यांचा मोबाईल वापरू लागला. मैत्रीखातर नाईक त्याकडे दुर्लक्ष करत असत. १६ जुलै सकाळी नाईक बँकेत गेले असता त्यांच्या खात्यात फक्त २० हजार रुपये शिल्लक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे समजताच त्यांचे धाबे दणाणले. नाईक यांनी तत्काळ बँक स्टेटमेंट घेतले. त्यात ८ एप्रिल ते २७ जून या कालावधीत बँक खात्यातू २२ लाख ३५ हजार रुपये गुगल पेद्वारे अन्य खात्यांत वळते झाल्याचे त्यांना समजले. नाईक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत तिवारी आणि गुप्ता या दोघांनाही अटक केली.