मोबाईल चोरणाऱ्या १९ जणांच्या टोळी जेरबंद : सव्वा सात लाखांचे ८२ हँडसेट जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 09:03 PM2019-09-13T21:03:10+5:302019-09-13T21:03:19+5:30
विसर्जन मिरवणुकीत मंडळांची आरास पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले आहे़.
पुणे : विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मंडळांची आरास पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले आहे़. या टोळीतील तब्बल १९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे़. त्यांच्याकडून ७ लाख १९ हजार रुपयांचे ८२ हँडसेट जप्त करण्यात आले आहे़. अटक मालेगाव व नांदेड परिसरातील असल्याचे पोलिसांनी सांगितले़. यावेळी फरासखाना पोलिस ठाण्यात ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़.
विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत होणारी चोऱ्या रोखण्यासाठी यंदा पोलिसांच्या वतीने खास तयारी करण्यात आली होती. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच साध्या वेशातील पोलिसांची पथके देखील गर्दीत तैनात होती. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन पवार व त्यांचे पथक गस्त घालत असताना ढेंगळे पुलाच्या खाली नदीपात्रात ४ जण संशयास्पदरित्या उभे असल्याचे त्यांनी पाहिले़ त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, नांदेड व मालेगाव येथून गणपती पाहण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे १८ मोबाईल मिळून आले. मात्र मोबाईलच्या बाबतीत विचारणा केली तेव्हा त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली त्यावेळी त्यांनी ते मोबाईल दगडूशेठ हलवाई मंदीराजवळ गदीर्चा फायदा घेत भाविकांचे चोरल्याचे कबूल केले. तसेच त्यांचे १४ ते १५ साथीदार चोऱ्या करण्यासाठी मिरवणूकीत आले असून, विविध भागात ग्रुप करुन ते चोऱ्या करत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची सुत्रे गतिमान करत तात्काळ रेल्वे स्टेशन दर्गा, मालधक्का जवळील रेल्वे हॉस्पिटल, ठुबे पार्क, शिवाजीनगर येथून इतर १५ जणांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून देखील विविध कंपन्यांचे ७४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
ही कामगिरी गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गजानन पवार, कर्मचारी यशवंत आंब्रे, संजय दळवी,अनिल ऊसुलकर, दिनेश गंडाकुश, अस्लम पठाण, अतुल गायकवाड, विशाल भिलारे यांच्या पथकाने केली.
़़़़़़़
विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यापासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत विश्रामबाग पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचे ३ तर फरासखाना पोलिसा ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरीसह इतर १२ गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.