मोबाइल हिसकावून चोरी करणारी टोळी गजाआड , पार्कसाइट पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 02:38 AM2020-08-30T02:38:48+5:302020-08-30T02:39:20+5:30
काही दिवसांपूर्वी मोहम्मद खान याचा महागडा मोबाइल दोघा जणांनी हिसकावून दुचाकीवरून पळ काढला होता. यावेळी पार्कसाइट पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत दुचाकी चालवणारा आरोपी युसूफ हैदर अली शेख यास अटक केली होती.
मुंबई - रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांचे फोन हिसकावून पळ काढणारी टोळी गजाआड झाली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये ही टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली होती. परंतु विक्रोळी पार्कसाइट पोलिसांना या टोळीला पकडण्यात यश आले आहे.
काही दिवसांपूर्वी मोहम्मद खान याचा महागडा मोबाइल दोघा जणांनी हिसकावून दुचाकीवरून पळ काढला होता. यावेळी पार्कसाइट पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत दुचाकी चालवणारा आरोपी युसूफ हैदर अली शेख यास अटक केली होती. त्यानंतर दुसरा पळून गेलेला आरोपी नावेद शेख यास मानखुर्दमधून ताब्यात घेतले. पोलिसांनी या दोघांची चौकशी केली असता एक टोळी मुंबईसह उपनगरात पादचाऱ्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून घेऊन त्यांचा आय.एम.ई.आय. नंबर बदलून विकत असल्याचे समोर आले.
हे चोरलेले मोबाइल संगणकातील सॉफ्टवेअरच्या मदतीने आय.एम.ई.आय. नंबर बदलून विकण्यात येत होते. यामध्ये मोहम्मद शेख, इक्बाल खान, सलमान आदिल, अहमद सिद्धीकी व साबीर खान यांचा हात होता. पोलिसांनी यातील साबीर खान याच्या शिवाजीनगर येथील दुकानावर छापा टाकला असता त्यांना या दुकानात चोरलेले ४८ महागडे मोबाइल एक हार्डडिस्क, दोन संगणक तसेच दोन गुन्ह्यांतील दुचाकी मिळाल्या. याची एकूण किंमत अंदाजे २ लाख ६६ हजार ५०० रुपये इतकी आहे. या आरोपींवर मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीने अजून मोबाइल चोरून विकले आहेत का? याचा तपास पोलीस करीत आहेत.