रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणारा गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 12:53 AM2019-10-02T00:53:58+5:302019-10-02T00:54:18+5:30
सातारा येथून मुंबईला येणाऱ्या कुलदीप नेकर यांचा मोबाइल धावत्या गाडीत चोरणारा नेरूळ येथील मुस्तकीन कुणाल मंडळ (२८) या चोरट्याला रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी फलाट क्रमांक ७ वर सोमवारी पकडले.
ठाणे : सातारा येथून मुंबईला येणाऱ्या कुलदीप नेकर यांचा मोबाइल धावत्या गाडीत चोरणारा नेरूळ येथील मुस्तकीन कुणाल मंडळ (२८) या चोरट्याला रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी फलाट क्रमांक ७ वर सोमवारी पकडले. चौकशीत त्याच्याकडे ४८ हजारांचे चार मोबाइल सापडले. हेल्पलाईनवर केलेल्या तक्रारीनंतर ठाणे रेल्वेस्थानकात गाडी येताच मुस्तकीन हा गाडीतून घाईगडबडीत उरताना पोलिसांना दिसला. त्याचवेळी तक्रारदारांच्या मोबाइलवर फोन केल्यावर तो त्याच्याकडे मिळून आल्याने अशाप्रकारे पाच मिनटांत त्याला पकडण्यात यश आल्याची माहिती आरपीएफ पोलिसांनी दिली.
नेकर हे साताºयाहून मुंबईत येत होते. पनवेल स्टेशन सोडल्यानंतर काही वेळाने त्यांचा मोबाइल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी एक्स्प्रेसमधील लावलेल्या स्टिकरवरील हेल्पलाईननंबर फोन केला. त्यांची तक्रार कंट्रोल बोर्डावर गेल्यावर तेथून ठाणे आरपीएफ पोलिसांना ती माहिती दिली. त्यानुसार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवीन सिंह यांच्यासह मुकेश यादव, इरफान शेख आणि भास्कर सावंत या कर्मचाऱ्यांनी तातडीने रेल्वे स्थानकात धाव घेतली. त्याचवेळी गाडी फलाटावर लागल्यावर मुस्तकीन हा घाईगडबडीत बाहेर पडताना त्याला ताब्यात घेतले.