मोबाईल चोरटे चोवीस तासात गजाआड, कल्याण गुन्हे अन्वेषणची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 06:43 PM2020-10-17T18:43:31+5:302020-10-17T18:44:24+5:30
Mobile Thief Arrested : चोरीच्या मोबाईलसह रिक्षाही जप्त
डोंबिवली - चोरटयांकडून दुकानाचे शटर उचकटून दुकानातील किमती माल चोरून नेण्याच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ झाली असताना येथील पुर्वेकडील के.डी.अग्रवाल हॉलनजीक असलेल्या श्रीशा मोबाईल दुकानाचे शटर उचकटून मोबाईल चोरणा-या त्रिकुटाला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी 24 तासात अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये एकजण अल्पवयीन आहे.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास या दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी त्यावाटे आत प्रवेश करून दुकानातील मोबाईल, ब्लूटुथ, पॉवर बॅक आणि रोकड असा 72 हजार 132 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा चोरीचा प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला होता. दरम्यान आयरे गाव रेल्वे पटरी परिसरात एका रिक्षात तिघेजण असून त्यांच्याकडे मोठया प्रमाणात मोबाईल आहेत आणि ते विक्री करण्याच्या प्रयत्न आहेत अशी माहीती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यांनी ही माहीती वरीष्ठ पोलीस निरिक्षक संजू जॉन यांना दिली. तत्काळ जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक भूषण दायमा, पोलीस उपनिरिक्षक नितीन मुदगुन. संदीप भालेराव, हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप, राजेंद्र खिल्लारे, मंगेश शिर्के, अजित राजपूत, सचिन साळवी, अरविंद पवार, सचिन वानखडे, प्रकाश पाटील, हरीश्चंद्र बंगारा, राहुल ईशी आदिंच्या पथकाने सापळा लावला. यात राहुल गोरक्षनाथ ननावरे (वय 21), राहूल जगन्नाथ पाल (वय 19) दोघेही राहणार आयरेगाव डोंबिवली पूर्व या दोघांसह एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात पथकाला यश आले. त्यांच्याकडून चोरीच्या मुद्देमालासह गुन्हयात वापरलेली रिक्षा असा 90 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींच्या चौकशीत 2 गुन्हे उघडकीस आले आहेत अशी माहीती वपोनि जॉन यांनी दिली.