मोबाइल चोरणारा अटकेत, १३ गुन्हे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 01:10 AM2019-06-28T01:10:43+5:302019-06-28T01:10:51+5:30
लोकलमध्ये मोबाइल चोरणारा सराईत चोरटा हरीश जाधव (२७, रा. अंबरनाथ) याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रंगेहाथ सोमवारी अटक केली आहे.
डोंबिवली : लोकलमध्ये मोबाइल चोरणारा सराईत चोरटा हरीश जाधव (२७, रा. अंबरनाथ) याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रंगेहाथ सोमवारी अटक केली आहे. हरीशने मागील काही दिवसांपासून १३ मोबाइल चोरले. त्यापैकी १२ मोबाइल त्याने लोणावळा-पुणे लोकलमध्ये चोरले असून, एक गुन्हा कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत घडला आहे.
गर्दीचा फायदा घेत तो महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिकांचे लक्ष विचलित करून त्यांचे मोबाइल चोरत होता. तसेच चालत्या लोकलमध्ये, लोकल स्थानकामध्ये थांबण्यापूर्वी तो मोबाइल चोरून गाडीतून उतरून पळ काढत होता, अशी माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी गुरुवारी दिली.
प्रवाशांकडील महागडे मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. हरीश २४ जूनच्या रात्री अंबरनाथ स्थानकात मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमधून एका प्रवाशाचा मोबाइल हिसकावून पळण्याच्या तयारीत असतानाच लोहमार्ग पोलिसांनी त्यास रंगेहाथ पकडले. चौकशीत त्याने लोणावळा-पुणे लोकलमध्ये १२ मोबाइल चोरल्याचे कबूल केले. तसेच कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने एक चोरी केल्याचे तपास अधिकारी रमेश चव्हाण यांनी सांगितले. हरीशकडून १३ मोबाइल हस्तगत केले आहेत. सोमवारी अटक केल्यानंतर त्याला मंगळवारी रेल्वे न्यायालयात हजर केले असता त्याची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे चव्हाण म्हणाले.