‘बरेली के बाजार से’ मुंबईत येऊन मोबाइल चोरणाऱ्या तरुणीला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 04:40 AM2018-08-02T04:40:02+5:302018-08-02T04:40:15+5:30
उत्तर प्रदेशातील बरेली येथून येऊन मुंबईसारख्या स्वप्ननगरीत स्थिरावत नाही, तोच लोकल प्रवासात हातचलाखीने मोबाइल आणि पाकीट लांबवणा-या जैनाम कमरु द्दीन शेख ऊर्फजैनाम खान या २३ वर्षीय तरुणीला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
- पंकज रोडेकर
ठाणे : उत्तर प्रदेशातील बरेली येथून येऊन मुंबईसारख्या स्वप्ननगरीत स्थिरावत नाही, तोच लोकल प्रवासात हातचलाखीने मोबाइल आणि पाकीट लांबवणा-या जैनाम कमरु द्दीन शेख ऊर्फजैनाम खान या २३ वर्षीय तरुणीला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सध्या ती जेलची हवा खात आहे. एखाद्या सराईत चोरट्यांसारखी ती सहजतेने पर्स उडवत असे. तिच्यावर ठाणे, मुंबई किंवा नवी मुंबई परिसरात एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकलमधील गर्दीत हातचलाखीने मोबाइल आणि पाकीट लांबवणाºयांवर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी पाळत ठेवून जुलैै महिन्यात ३३ गुन्हे उघडकीस आणले. त्यावेळी २५ चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यामध्ये दोन महिला चोरट्यांचा समावेश असून त्यामध्ये एक सराईत आहे, तर दुसरीवर एकही गुन्हा दाखल नसल्याचे तपासात समोर आले आहे. मुंबईत एकही गुन्हा दाखल नसलेली जैनाम नुकतीच उत्तर प्रदेशातील बरेली येथून मुंबईत दाखल झाली होती. त्यानंतर, ती १० दिवसांपासून मुंब्य्रात वास्तव्याला आली होती.
ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या पथकाने लोकल प्रवासात २८ जुलै रोजी तिला चोरी करताना रंगेहाथ पकडले. चौकशीत तिने पाच गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यामध्ये दोन मोबाइल आणि तीन पाकीटचोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. न्यायालयाने तिची रवानगी जेलमध्ये केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तिच्यावर उत्तरप्रदेशात गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती पोलीस यंत्रणा घेणार आहे.
वाढत्या मोबाइलचोरीच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे, तेथे सध्या विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये दोन महिलांना रंगेहाथ चोरी करताना पकडले असून त्यामधील जैनाम ही एक आहे. तपासात तिच्यावर एकही गुन्हा दाखल नसल्याचे तसेच नुकतीच उत्तर प्रदेशातून आली असल्याचे ती सांगते.’’
- राजेंद्र शिरतोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे लोहमार्ग पोलीस, ठाणे