खाकीतील दुर्गांनी मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 05:23 PM2018-10-16T17:23:40+5:302018-10-16T17:24:18+5:30
सोमवारी रात्री २ ते २. ३० वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी डाव साधत गोरेगावातील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बस स्टॉपजवळ एका पादचाऱ्यास मारहाण करून जखमी केले आणि त्याच्याकडील मोबाईल फोन लंपास केला. चोरी करुन पळ काढणाऱ्या दोन चोरांना मुंबई पोलिसांच्या दोन महिला पोलिसांनी पाठलाग करुन अटक केली.
मुंबई - नुकतेच महिला पोलीस कर्मचारी मनिषा विसपुते यांनी कर्तव्य बजावत असताना माणुसकी दाखवत एका पोलिसाचे प्राण वाचविले. तर काल रात्री उशिरा आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना महिला अंमलदार महिला पोलिस शिपाई सोनी मराठे आणि वर्षा शिंदे यांनी विरवाणी बस स्टॉप गोरेगाव (पूर्व)येथे एका पादचाऱ्याला मारून त्याच्या ताब्यातील मोबाईल आणि पैसे काढून पळून जात असलेल्या दोन सराईत चोरांचा शिताफीने पाठलाग केला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी समाजकंटकांच्या मुसक्या बहाद्दुरीने आवळल्या आहेत. त्यामुळे पोलीस दलात या खाकीतील दोन दुर्गांचे म्हणून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे आरे या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील महिला असून त्यांचं नावं विजयालक्ष्मी हिरेमठ आहे.
सोमवारी रात्री २ ते २. ३० वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी डाव साधत गोरेगावातील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बस स्टॉपजवळ एका पादचाऱ्यास मारहाण करून जखमी केले आणि त्याच्याकडील मोबाईल फोन लंपास केला. चोरी करुन पळ काढणाऱ्या दोन चोरांना मुंबई पोलिसांच्या दोन महिला पोलिसांनी पाठलाग करुन अटक केली. आरे येथे रात्रपाळीला पोलीस मोबाईल व्हॅन क्रमांक ५ वर पोलीस शिपाई सोनी मराठे आणि वर्षा शिंदे या कर्तव्य बजावत होत्या. गस्त घालत असताना या दोघींना गोरेगाव पूर्व येथील विरवाणी बसस्टॉपजवळ एका व्यक्तीवर दोन जण हल्ला करताना दिसले. हल्लेखोरांनी एका पादचाऱ्याच्या डोक्यात वार करुन त्याला जखमी करुन त्याच्याकडून मोबाईल व पैसे घेऊन पळ काढत होते. थोडाही वेळ न दवडता समयसूचकता दाखवत घटनास्थळी पोहोचलेल्या या दोघींनी शिताफीने या दोन सराईत चोरांचा पाठलाग करुन त्यांना अटक केली. जखमी पादचाऱ्यालाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघींनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे पादचाऱ्यांचे प्राण तर वाचलेच शिवाय दोन सराईत चोरांनाही अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. या कामगिरीमुळे मुंबई पोलीस दलातील या दोन्ही नवदुर्गांचे कौतुक होत आहे.
खाकीतील नवदुर्गा; महिला पोलिसाच्या तत्परतेनं वाचले सहकाऱ्याचे प्राण