सरकारी यंत्रणांवरील सायबर हल्ले टाळण्यासाठी ‘मॉक ड्रील्स’

By योगेश पांडे | Updated: December 13, 2024 00:20 IST2024-12-13T00:20:42+5:302024-12-13T00:20:52+5:30

देशभरात शंभराहून अधिक ड्रील्स : गोपनीय माहितीच्या रक्षणासाठी ‘सायबर सिक्युरिटी’वर भर

'Mock Drills' to Prevent Cyber Attacks on Government Systems | सरकारी यंत्रणांवरील सायबर हल्ले टाळण्यासाठी ‘मॉक ड्रील्स’

सरकारी यंत्रणांवरील सायबर हल्ले टाळण्यासाठी ‘मॉक ड्रील्स’

नागपूर : मागील काही काळापासून शासकीय यंत्रणेवरदेखील सायबर हल्ल्यांच्या घटना वाढीस लागल्या आहेत. यातून मोठ्या प्रमाणावर गोपनीय माहिती देशविघातक तत्त्वांच्या हाती लागू शकते. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र शासनातर्फे शासकीय विभागांमधील ‘सायबर’ सुरक्षेची नियमित तपासणी करण्यासाठी ‘मॉक ड्रील्स’ची सुरुवात करण्यात आली आहे. देशभरात अशा प्रकारच्या शंभराहून अधिक ड्रील्स करण्यात आल्या आहेत.

‘सर्ट इन’तर्फे (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) हा देशपातळीवर पुढाकार घेण्यात आला आहे. हा स्वयंचलित सायबर सुरक्षेशी संबंधित एक्स्चेंज प्लॅटफॉर्म असून विविध क्षेत्रात सायबर हल्ल्यांच्या घटनांचे विश्लेषण करण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात येत आहे. ‘सर्ट ईन’तर्फे सरकारी विभागांमधील सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी नियमितपणे मॉक ड्रील्सची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. 

विशेषत: गोपनीय माहिती असलेल्या विभागांशी संदर्भात हा पुढाकार घेण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत देशपातळीवर अशा १०४ ‘मॉक ड्रील्स’ घेण्यात आल्या आहेत. यात विविध राज्यांतील १ हजार ४५० संस्थांना सहभागी करून घेण्यात आले होते. या माध्यमातून काही विभागांतील मोठ्या त्रुटी व संभाव्य सायबर धोकेदेखील समोर आले आहेत.

साडेनऊ हजारांहून अधिक अधिकारी ‘सायबर एक्सपर्ट’
शासकीय विभागांच्या नेटवर्क प्रणालीत कार्यरत असलेल्या सरकारी व निमसरकारी संस्थांमधील नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर तसेच ‘चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर्स’चा ‘डेटा बेस’ तयार करण्यात आला आहे. संवेदनशील विभागांमधील आयटीसंदर्भातील यंत्रणा मजबूत करणे तसेच सायबर हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी ‘सर्ट इन’कडून संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत देशभरातील अशा ९ हजार ८०७ अधिकाऱ्यांना सायबर सिक्युरिटीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे अधिकारी ‘एक्सपर्ट’ व्हावे यादृष्टीनेच हे प्रशिक्षण मॉड्युल्स तयार करण्यात आले आहेत.

धोकादायक संगणक ‘प्रोग्राम्स’वरदेखील प्रहार
‘सर्ट इन’कडून केवळ सरकारी यंत्रणाच नाही तर जनसामान्यांमध्येदेखील सायबर जागृतीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. ‘सर्ट इन’तर्फे राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. संभाव्य सायबर धोक्यांबाबत या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. विशेषत: विविध ‘मॅलिशिअल प्रोगाम्स’ व सॉफ्टवेअर शोधून त्यांना संगणक यंत्रणेतून दूर करण्यासाठी ‘सर्ट इन’कडून सायबर स्वच्छता केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. मुळात हे केंद्र तांत्रिकदृ्ट्या ‘बॉटनेट क्लिनिंग ॲन्ड मालवेअर ॲनालिसीस सेंटर्स’ आहेत. धोकादायक प्रोग्राम्स हटविण्यासाठी या केंद्राकडून ‘टूल्स’देखील उपलब्ध करून देण्यात आले असून सामान्य नागरिकदेखील त्याचा लाभ घेऊ शकतात, हे विशेष.
 

Web Title: 'Mock Drills' to Prevent Cyber Attacks on Government Systems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.