लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून मोहनमाळ लांबविली; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 09:55 PM2023-05-12T21:55:38+5:302023-05-12T21:56:45+5:30
या प्रकरणी चोरट्यांविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना : धाराशिव येथून लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दोन लाख ५० हजार रूपये किंमतीची मोहन माळ चोरून नेल्याची घटना परतूर येथील गजानन मंगल कार्यालयाच्या गेटवर शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तांबरी येथील सुनिल पाटील यांच्या पुतण्याचे परतूर येथील गजानन मंगल कार्यालयात शुक्रवारी लग्न होते. यासाठी सुनिल पाटील, त्यांची भावजई उज्वला पाटील, आशा पाटील, आकाश पाटील, आदित्य पाटील हे शुक्रवारी आले होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास गजानन मंगल कार्यालयाच्या गेटवर उभा असतांना, दुचाकीवरून दोन अनोळखी इसम तेथे आले. त्यांनी उज्वला पाटील यांच्या गळ्यातील २ लाख ५० हजार रूपये किंमतीची पाच तोळ्याची मोहन माळ हिसकावून नेली. त्यानंतर महिलांनी आरडाओरड केली. परंतु, चोरटे फरार झाले. याची माहिती परतूर पोलिसांना देण्यात आली.
परतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणी सुनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.