मोहफुल दारू विक्रेत्यांची पोलिसांना धक्काबुक्की, आरोपी पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 05:17 PM2021-05-22T17:17:12+5:302021-05-22T17:17:53+5:30
Crime News : सावली येथून जवळच असलेल्या किसाननगर येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांना एक जण प्लास्टिकच्या डबकीमध्ये दारू नेत असल्याचा संशय आला.
चंद्रपूर : दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना दारूविक्री करणाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना सावली तालुक्यातील किसाननगर येथे घडली. दरम्यान, पोलिसांच्या भीतीपोटी धक्काबुक्की करणारे दारू विक्रेते घटनास्थळावरून पसार झाले. एकाच कुटुंबातील वडील व दोन मुलांसह अन्य आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. आकाश गरीबचन्द मजोके (30), सुमित गरीबचन्द मजोके (35) गरीबचन्द मजोके (56) आणि अन्य सर्व रा. किसाननगर ता सावली अशी मोहफूल दारू विक्रेत्या आरोपींची नावे आहेत.
सावली येथून जवळच असलेल्या किसाननगर येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांना एक जण प्लास्टिकच्या डबकीमध्ये दारू नेत असल्याचा संशय आला. लगेच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी संबंधिताला पकडले. तेव्हा कारवाईच्या भीतीपोटी पैसे घ्या पण सोडा, अशी विनंती तो करू लागला. मात्र पोलिसांनी मान्य न केल्याने त्या इसमाने आपल्या कुटुंबातील सदस्यांना बोलावून पोलिसांना धक्काबुक्की करून घटनास्थळावरून धूम ठोकली.
या घटनेनंतर सावलीतून पोलीस ताफा घटनास्थळावर दाखल झाला. आरोपींचा शोध लागला नाही. अखेर पोलिसांनी आरोपींविरुद्ध 354, 324, 323, 504, 506,34 भादंवी सहकलम 65 व 83 दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस तपास सुरु आहे. किसाननगर येथून सावली तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात मोहफुलाच्या दारुचा पुरवठा होत असल्याचे समजते. संबंधित दारू विक्रेते पोलिसांना जुमानत नसल्याची चर्चा आहे.