251 रुपयांना स्मार्टफोन विकणाऱ्या मोहित गोयलला पुन्हा अटक, बलात्कार पीडितेला धमकी दिल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 12:05 PM2021-10-10T12:05:50+5:302021-10-10T12:08:27+5:30
'Freedom 251' स्मार्टफोन प्रकरणात मोहित गोयलविरोधात फसवणुकीशी संबंधित 48 गुन्हे दाखल करण्यात आले.
नवी दिल्ली: पाच वर्षांपूर्वी 251 रुपयांना स्मार्टफोन देण्याची स्कीम आणून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मोहित गोयलला पुन्हा एकदा पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी मोहितवर बलात्कार पीडितेला धमकी दिल्याचा आरोप आहे. मोहित गोयल व्यतिरिक्त आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांवर बलात्कार पीडितेला एका वर्षांपासून धमकी दिल्याचा आरोप आहे. मोहित व्यतिरिक्त आणखी दोन आरोपी ज्यांना अटक करण्यात आली आहे त्यात सुमित यादव आणि विनीत कुमार यांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास मित्तल नावाच्या एका व्यक्तीवर महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. तो त्या प्रकरणातून जामीवार बाहेर आला होता. पण, 2020 मध्ये पीडित महिलेला तक्रार परत घेण्यासाठी फोनवरुन धमकी देण्यात आली. ही धमकी विकास मित्तलच्या नावाने देण्यात आली. महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी विकासला अटक केली. पण, त्यानंतरही महिलेला वारंवार धमक्या मिळू लागल्या.
पोलिसांनी तपास केला असता, मोहित गोयल, सुमित यादव आणि विनीत कुमार या तिघांनी महिलेला धमकी दिल्याचे उघड झाले. तपासात समोर आले की, मोहित गोयल आणि विकास मित्तलचे व्यवसायिक वाद होते आणि याच वादाचा बदला घेण्यासठी मोहितने विनीत आणि सुमितसोबत मिळून विकासच्या नावाने महिलेला धमक्या दिल्या. याप्रकरणी पोलिसांनी विनीत कुमारला गुरुग्राममधून पकडलं. त्याने पीडितेला धमकी दिल्याची कबुली दिली आणि मोहित गोयल आणि सुमित यादव यांची नावे घेतली. या आधारावर गोयलला नोएडा आणि यादवला चंदीगड येथून अटक करण्यात आली आहे.
Freedom 251 होते फोनचे नाव
शामली येथील रहिवासी मोहित गोयलने रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी सुरू केली आणि केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत फक्त 251 रुपयांमध्ये स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली होती. त्या फोनचे नाव 'Freedom 251' असे ठेवले होते. पण, ही स्कीम फेल ठरली आणि कंपनीकडून अनेकांची फसवणूक करण्यात आली. यानंतर गोयलविरुद्ध फसवणुकीशी संबंधित 48 गुन्हे दाखल करण्यात आले. त्याला अटकही करण्यात आली. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.