मंगळुरु एक्सप्रेसमध्ये केळी विक्रेत्या महिलेचा विनयभंग करून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 07:06 PM2019-01-11T19:06:03+5:302019-01-11T19:11:54+5:30
संशयित पॅन्ट्रीच्या मॅनेजरसह अन्य साथिदारावर गुन्हा
मडगाव - धावत्या एक्स्प्रेसमध्ये एका केळी विक्रेत्या महिलेचा विनयभंगाची खळबळजनक घटना घडली आहे. कोकण रेल्वेच्या मंगळुरु एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली असून याच रेल्वेत पॅन्ट्रीचा मॅनेजर असलेल्या रवी नावाच्या एका इसमाने हे कृत्य केले आहे. रवी व त्याच्या अन्य साथिदारावर गोव्यातील मडगावच्या कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा देखील नोंद करण्यात आला आहे. तसेच संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
काल ही घटना घडली. पीडित महिला मूळ आंध्रप्रदेश येथील आहे. ती सध्या गोव्यातील मडगाव येथे राहत आहे. ही महिला रेल्वेत केळी विकत असून नेहमीप्रमाणे ती गुरुवारी मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकात मंगळुरु एक्सप्रेसमध्ये चढली होती. रेल्वेने काही अंतर कापल्यानंतर रवी हा या रेल्वेच्या सर्वसाधारण डब्यात आला. तिने त्या महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने विरोध केला. नंतर संशयिताने तिला मारहाणही केली. रेल्वे कुमठा येथे पोहचल्यानंतर ती महिला खाली उतरली असता, रवी याचे अन्य चार साथीदार तेथे आले व तिला त्यांनी मारहाण केली. हे संशयित अंदाजे 25 ते 30 वयोगटातील होते. अर्वाच्य भाषेत शिविगाळ करुन संशयिताने तिची साडी उतरविण्याचही प्रयत्न केला असे तक्रारीत नमूद केले आहे.
कोकण रेल्वे पोलिसांनी सध्या संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलिसांनी सुरु केली असल्याची माहिती देण्यात आली. भारतीय दंड संहितेच्या 354,354 (अ), 354 (ब) 354 (ड), 323, 504 कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम आरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उदय एस. राणे पुढील पोलीस तपास करीत आहेत.