भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात विनयभंग; गृहराज्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर महिनाभराने एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 01:15 PM2021-09-23T13:15:40+5:302021-09-23T13:18:16+5:30
साळवीने या महिलेला १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास खेडेकर यांच्या वझीरा नाका येथील कार्यालयात बोलावले आणि तिचा विनयभंग केला.
मुंबई : भाजप नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात एका कार्यकर्त्याने विनयभंग केला. त्याची तक्रार आमदार व खासदार यांच्याकडे केली म्हणून नगरसेविका आणि सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप समाजसेविकेने केला आहे. याविरोधात महिनाभरापूर्वी तक्रार करूनही गुन्हा दाखल झाला नाही. अखेर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे दाद मागितल्यावर बोरीवली पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्याने केला.
पीडित महिलेला समाजसेवेची आवड असल्याने ती २०२० मध्ये खेडेकर यांच्या संपर्क कार्यालयात आली होती. तिथे तिची प्रतीक साळवीशी भेट झाली. त्यांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांकही घेतले. साळवीने या महिलेला १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास खेडेकर यांच्या वझीरा नाका येथील कार्यालयात बोलावले आणि तिचा विनयभंग केला. याची तक्रार तिने स्थानिक खासदार आणि आमदार यांच्याकडे केली. हे कळताच, नगरसेविका खेडेकर यांनी तिला फोन करून कार्यालयात बोलावून घेतले आणि तक्रार का केली? अशी विचारणा केली.
साळवीने तिच्याशी केलेल्या अश्लील वर्तनाबाबत तिने खेडेकर तसेच इतर उपस्थितांना सांगितले. तेव्हा दुसऱ्या एका महिलेने तिला मारले. इतरांनीही तिला मारहाण करीत ऑफिसबाहेर हाकलले, असा आरोप पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला. तिने आरटीआय कार्यकर्ते संतोष घोलप यांची भेट घेतल्यावर त्यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कानावर हा प्रकार घातला. पाटील यांनी बोरीवली पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर साळवी याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.