विनयभंग प्रकरण : माजी आमदार सांगळेंच्या शोधात पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 07:12 AM2019-03-19T07:12:43+5:302019-03-19T07:12:53+5:30
माजी आमदार मंगेश सांगळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला आहे. सांगळेंच्या अटकेसाठी रबाळे पोलिसांनी त्यांच्या घरासह इतर ठिकाणी शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत.
नवी मुंबई : माजी आमदार मंगेश सांगळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला आहे. सांगळेंच्या अटकेसाठी रबाळे पोलिसांनी त्यांच्या घरासह इतर ठिकाणी शोध घेतला असता ते आढळून आले नाहीत.
ऐरोली सेक्टर ८ येथे राहणारे माजी आमदार मंगेश सांगळे यांच्याविरोधात तरुणीच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, शनिवारी गुन्हा दाखल होताच सांगळे यांनी पोबारा केला आहे. सांगळे राहत असलेल्या इमारतीमध्येच राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीला घरी बोलावून त्यांनी तिच्यासोबत अश्लील चाळे केले. यामुळे भयभित झालेल्या तरुणीने त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर तिने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, सांगळेंच्या अटकेसाठी पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरासह इतर ठिकाणी शोधाशोध करूनही ते हाती लागलेले नाहीत. तर त्यांचा शोध सुरू असून लपलेल्या ठिकाणाची माहिती मिळताच त्यांना पकडले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
म्हाडाशी संबंध नाही
माजी आमदार मंगेश सांगळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त लोकमतच्या अंकात सोमवारी प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये सांगळे हे म्हाडाचे संचालक असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र म्हाडामध्ये संचालक हे पद अस्तित्वात नसून, माजी आमदार मंगेश सांगळे यांचाही म्हाडाशी कसलाच संबंध नसल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे.