तक्रारदार तरुणीचा विनयभंग; पोलीस उपनिरीक्षकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 03:07 AM2020-05-21T03:07:16+5:302020-05-21T03:07:30+5:30
पीडित तरुणीला पोलीस चौकीने निमराणा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितल्यावरून ती आली होती.
जयपूर (राजस्थान) : भिवाडीतील निमराणा येथे कंपनीत कामाला असलेल्या तरुणीचा (२३) अलवार जिल्ह्यात विनयभंग केल्याच्या आरोपावरून पोलीस सहायक उपनिरीक्षक सुरेंद्र सिंह (४५) याला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले.
पीडित तरुणीला पोलीस चौकीने निमराणा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितल्यावरून ती आली होती. तिची तक्रार नोंदवून घेतल्यावर चौकीचा प्रभारी सुरेंद्र सिंह याने तिला जेथे जायचे होते तेथे नेऊन सोडतो, असे सांगून स्वत:च्या वाहनाने नेले व तिला इच्छित स्थळी न सोडता निमराणातील जपानी औद्योगिक विभागात नेऊन तेथे तिचा विनयभंग केला. तिने सुरेंद्र सिंह याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार १७ मे रोजी दिली. तिचे म्हणणे नोंदवून घेतल्यावर सुरेंद्र सिंह याला मंगळवारी अटक करण्यात आली, असे भिवाडीचे पोलीस अधीक्षक अमनदीप सिंह कपूर यांनी सांगितले.
निमराणा पोलीस ठाण्याचे अधिकारी संजय शर्मा म्हणाले की, पीडित तरुणीने रेशनचे धान्य मिळण्यासाठी मदत मागितली होती. ती ज्या कंपनीत कामाला होती त्या कंपनीने तिला वेतन दिले नव्हते. मी तिला रेशनची व्यवस्था करून दिली. काही दिवसांनी ती मला भेटली व मी घरभाडे देऊ शकत नाही व मला ते सतत मागितले जात आहे, असे म्हणाली. यानंतर मी तिला तक्रार देण्यास सांगितले. कारण तिचा विषय हा चौकीच्या हद्दीतील होता म्हणून मी तिला चौकीच्या प्रभारीकडे पाठवले होते, असेही शर्मा म्हणाले.