महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या मुलीचा विनयभंग; शिवाजी पार्क पोलिसांनी केली अटक
By पूनम अपराज | Published: February 10, 2019 03:07 PM2019-02-10T15:07:37+5:302019-02-10T17:16:03+5:30
राहुल सारीपूत्रा (31) असं या आरोपीचे नाव आहे.
मुंबई - महाष्ट्रातील एका प्रसिद्ध आणि बड्या राजकीय नेत्याच्या मुलीच्या नावाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करणाऱ्यास शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. राहुल सारीपूत्रा (31) असं या आरोपीचे नाव आहे.
मूळचा कोल्हापूरचा रहिवाशी असलेला राहुल सारीपूत्र हा 'बीए' पास झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर स्वतःचे तीन खाती बनवली होती. या खात्यावरून त्याने महाराष्ट्रातील एका बड्या राजकीय पक्षाचे अध्यक्षच्या मुलीला आणि तिच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. राजकीय नेत्याच्या मुलीने त्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली नाही. मात्र, तिच्या मित्रांनी ती फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारली. त्यामुळेच राहुल राजकीय नेत्याच्या मुलीच्या नावाने पोस्ट करून त्या पोस्ट तिच्या मित्रांना टॅग करू लागला. इतकंच नव्हे तर त्याने तिच्या मित्रांशी राहुलने चॅट देखील केले. तसेच काही मित्रांना अप्रत्यक्ष धमक्या ही दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत राजकीय नेत्याच्या मुलीला तिच्या मित्रांनी माहिती दिल्यानंतर तिने आपल्या कार्यकर्त्याच्या नावाने अनोळखी इसमाविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलिसांनी या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तांत्रिक दृष्ट्या खोलवर तपास सुरू केला. त्यावेळी संबंधित फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट हे कोल्हापुरातून हाताळल्याचे उघड झाले. त्यानुसार तपासाअंती पोलिसांनी कोल्हापूरहून राहुलला 7 फेब्रुवारीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी राहुलविरोधात भा. दं. वि. कलम 354(ड), 500, 507 आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 61(अ), 66(ड),67(अ) या अंतर्गत गुन्हा दाखक करण्यात आला आहे. आपल्याकडून चुकून ही घटना घडल्याची कबूली राहुलने पोलिसांनी दिली. राहुलला न्यायालयात हजर केले असता त्याला 16 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.