रिक्षाप्रवासादरम्यान तरुणीसोबत अश्लील वर्तन, ट्विटरद्वारे दिली पोलिसांना माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 22:25 IST2020-03-02T22:23:39+5:302020-03-02T22:25:54+5:30
याबाबत तरुणीने ट्विटरद्वारे तक्रार करताच पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.

रिक्षाप्रवासादरम्यान तरुणीसोबत अश्लील वर्तन, ट्विटरद्वारे दिली पोलिसांना माहिती
मुंबई - प्रवासादरम्यान रिक्षातील प्रवासी महिलेसोबत रिक्षाचालकाने अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना गोरेगाव परिसरात शनिवारी घडली. याबाबत तरुणीने ट्विटरद्वारे तक्रार करताच पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.
गोरेगाव येथे राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने शनिवारी सकाळी आपल्या घराजवळून रिक्षा पकडली. रिक्षात बसल्यापासून ४८ वर्षीय रिक्षाचालक तिच्याकडे अश्लील नजरेने पाहू लागला. सुरुवातीला तिने त्याच्याकडे कानाडोळा केला. मात्र, सिद्धार्थ नगर, गोरेगाव पश्चिम ते एमटीएनएल सिग्नल गोरेगाव पश्चिम यादरम्यान रिक्षाचालक तिच्याकडे पाहून अश्लील वर्तन करू लागला. रिक्षाचालकाचे वागणे पाहून तरुणी प्रचंड घाबरली. तिने रिक्षाच्या क्रमांकासह मुंबईपोलिसांच्या ट्विटर हँडलवर तक्रार केली. या तक्रारीची ताबडतोब दखल घेत पोलिसांच्या ट्विटर टीमकडून ही माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी रिक्षाचालकाला शोधून काढले. सोमवारी या रिक्षाचालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.