चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून एमबीए विद्यार्थिनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:31 AM2019-06-05T01:31:26+5:302019-06-05T01:31:32+5:30
मुंबई : चित्रपटात अभिनयाची संधी देण्याच्या नावाखाली विनयभंग केल्याचा आरोप एमबीएच्या विद्यार्थिनीने केला आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी चित्रपट ...
मुंबई : चित्रपटात अभिनयाची संधी देण्याच्या नावाखाली विनयभंग केल्याचा आरोप एमबीएच्या विद्यार्थिनीने केला आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी चित्रपट निर्माता आणि संगीतकार या दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. करण वाही आणि एम. एस. नगार अशी अटक दुकलीची नावे आहेत.
तक्रारदार २२ वर्षांची विद्यार्थिनी निशा (नावात बदल) हिने नुकताच एमबीएचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तिला अभिनयाची आवड असल्याने ती उत्तराखंडमधून मुंबईत आली होती. नगारच्या एका चित्रपटासाठी वाही याला महिला कलाकाराची गरज होती. त्याने याबाबत चौकशी करण्यासाठी एका मैत्रिणीला फोन केला. तिने त्याला निशाचा मोबाइल क्रमांक दिला. वाही याने निशाशी संपर्क साधला. तिची भेटही घेतली. त्यानंतर वाही याने निशाला त्याच्या चारकोपमधील फ्लॅटमध्ये भेटायला बोलावले. निशा पोहोचली तेव्हा तिथे वाहीसह नगारही हजर होता. त्यांनी निशाला शीतपेय दिले. त्यानंतर ती १८ तासांनी शुद्धीवर आली. स्वत:ला विवस्त्र अवस्थेत फ्लॅटमध्ये पाहून तिला धक्का बसला. तिच्या अंगावर बऱ्याच जखमा होत्या. त्यानुसार तिच्या शीतपेयामध्ये गुंगीचे औषध मिसळून त्यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सीसीटीव्हीतून उघड झाले सत्य
वाहीच्या फ्लॅटमधून बाहेर पडत निशा तिला त्याच्याकडे पाठवणाºया महिलेच्या घरी गेली आणि घडलेला प्रकार तिला सांगितला. त्या महिलेने वाहीला फोन केला आणि याबाबत विचारणा केली. मात्र निशा मुलाखत देऊन लगेच निघून गेली त्यानंतर काय झाले याबाबत आम्हाला काहीच माहीत नसल्याचे उत्तर त्याने दिले. अखेर या महिलेने निशाला घेऊन चारकोप पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी वाहीच्या इमारतीचे सीसीटीव्ही फूटेज पडताळले तेव्हा निशा त्याच्या फ्लॅटमध्ये गेली आणि जवळपास १८ तासांनी बाहेर आल्याचे उघड झाले. त्यानुसार निशाच्या तक्रारीवरून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाही आणि नगार या दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली आहे. निशाला विवस्त्र केले; मात्र तिच्यावर अत्याचार केला नसल्याचे संशयित आरोपींनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.