जाहिरात प्रतिनिधी असल्याची बतावणी करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 07:58 PM2018-12-17T19:58:24+5:302018-12-17T20:00:18+5:30
ओशिवरा पोलिसांनी आरोपी विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर सीसीटीव्हीत कैद आरोपीचा शोध सुरु करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई - १७ वर्षीय तरुणीला प्रोफाइल घेण्यासाठी बोलावून आपण प्रसिद्ध कंपनीत जाहिरात प्रतिनिधी असल्याची बतावणी केली आणि प्रोफाइल देण्यासाठी आलेल्या तरुणीला इमारतीच्या पाचव्या मजल्यावर नेऊन तिच्याशी अश्लील वर्तन केले. १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. हा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात घडला आहे. ओशिवरा पोलिसांनी आरोपी विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर सीसीटीव्हीत कैद आरोपीचा शोध सुरु करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अंधेरी लोखंडवाला मार्केटमधील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर हा घृणास्पद प्रकार घडला. १७ वर्षाची तरुणी अंधेरीत कुटुंबासह राहते. वडिलांचा मीरारोड येथे टूर्स आणि ट्रॅव्हलर्स व्यवसाय असून तरुणी १२ वी कॉमर्समध्ये शिकत आहे. तिचा संपर्क ३० वर्षीय अज्ञात तरुणाशी आला होता. त्याने आपण प्रसिद्ध जाहिरात कंपनीत जाहिरात प्रतिनिधी असल्याची खोटी बतावणी केली. एका प्रसिद्ध शितपेयाच्या जाहिरातीत काम करतो असे सांगून भामट्या तरुणाने तिची सर्व माहिती मिळवली. मात्र, तरुणीला तिची शारीरिक उंची माहिती नव्हती म्हणून तिला उंची काढण्यासाठी त्याच्या कार्यालयात इमारतीच्या पाचव्या माळ्यावर आणले. कार्यालय बंद होते. त्यावेळी भामट्या तरुणाने त्याच ठिकाणी तिची उंची घेण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअनव्ये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.