अल्पवयीन मुलीचा विनयभंग; कुर्डूवाडीच्या एकास कारावास
By शीतलकुमार कांबळे | Published: October 1, 2023 03:05 PM2023-10-01T15:05:57+5:302023-10-01T15:06:17+5:30
ही शिक्षा बार्शी न्यायालयाने सुनावली आहे.
सोलापूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग केल्याप्रकरणी कुर्डूवाडी (ता. माढा) येथील एकास कारावासाची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. महादेव चंदू पवार (रा. कुर्डूवाडी, ता. माढा) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. ही शिक्षा बार्शी न्यायालयाने सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, महादेव पवार याने इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी महादेव पवार याच्याविरोधात बार्शी सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन ३० सप्टेंबर २०२३ रोजी बार्शी येथील विशेष सत्र न्यायाधीश जयेंद्र सी. जगदाळे यांनी आरोपी महादेव पवार यास दोषी धरून एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड तसेच लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोन वर्षे साध्या कारावासाची शिक्षा व एक हजार दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
या खटल्यामध्ये अभियोग पक्षाच्या वतीने प्रदीप बोचरे, डी.डी. देशमुख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पाेकॉ. अतुल पाटील, पोना भाऊराव शेळके यांनी काम पाहिले. तसेच, मूळ फिर्यादीतर्फे ॲड. आय.के. शेख व ॲड. योगेश साठे यांनी काम पाहिले.