महिलेला अश्लिल मेसेज पाठविणाऱ्या वकिलाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 03:04 PM2018-10-09T15:04:27+5:302018-10-09T15:06:54+5:30
महिलेला लैंगिक स्वरुपाचे अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यातील एका प्रसिद्ध वकिलाविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : महिलेला लैंगिक स्वरुपाचे अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी पुण्यातील एका प्रसिद्ध वकिलाविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अॅड़ श्रीकांत नारायण पाटील (रा़ घोले रोड, शिवाजीनगर) असे या वकिलाचे नाव आहे. हा प्रकार ११ मे ते २६ जून २०१८ दरम्यान घडला होता़.
एका ४७ वर्षाच्या महिला वकिलांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अॅड. पाटील यांच्या जमिनीचा वाद दहा वर्षांपासून अधिक काळ सुरु आहे. पाटील यांच्या प्रतिवादीकडून काही वर्षांपूर्वी या महिला काम पाहू लागल्या. उच्च न्यायालयातील एका खटल्यात पाटील यांच्याविरुद्ध निकाल लागला़. त्या रागातून या महिला वकिलांच्या मोबाईलवर ११ मे २०१८ पासून अश्लिल, घाणेरडे लैंगिक स्वरुपाचे मेसेज पाठविण्यास सुरुवात केली़. त्यांच्या आई वडिलांबाबत अश्लिल मेसेज पाठविले़ याबाबत या महिलेने त्यांना अशा प्रकारे कोणतेही मेसेज पाठवू नका, असे सांगितले. तरीही त्यांनी या महिलेला असे मेसेज पाठविणे सुरुच ठेवले. त्यानंतर त्यांनी डेक्कन पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. डेक्कन पोलिसांनी या अर्जाची चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्यानंतर पोलिसांनी या महिलेची फिर्याद घेऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड अधिक तपास करीत आहेत.