शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 03:58 AM2018-07-14T03:58:20+5:302018-07-14T03:58:34+5:30
महापालिका शाळेतील एका विद्यार्थिनीचा विजय धंदर या शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पालिका आयुक्तांनी शिक्षकाला त्वरित निलंबित केले.
उल्हासनगर : महापालिका शाळेतील एका विद्यार्थिनीचा विजय धंदर या शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पालिका आयुक्तांनी शिक्षकाला त्वरित निलंबित केले.
उल्हासनगर कॅम्प नं-१, गोलमैदान परिसरात महापालिका शाळा क्र. २७ ही हिंदी माध्यमाची शाळा आहे. शुक्रवारी सकाळी इयत्ता सातवी उत्तीर्ण झालेली मुलगी शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी आली. त्यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र सोनावणे नसल्याने धंदर यांच्याकडे तिने दाखल्याची मागणी केली. खोलीत कोणी नाही, ही संधी साधून शिक्षकाने मुलीचा विनयभंग केला. मुलीने ही माहिती आईवडिलांना सांगितली. संतप्त पालकांनी शाळेत येऊन मुख्याध्यापकांकडे जाब विचारला. यापूर्वीही मुलीसोबत याच शिक्षकाने छेडछाड केल्याचे पालकांनी सांगितले. धंदर यांनी मुलीसह पालकांची माफी मागितली. तसेच मुख्याध्यापकांकडे माफीनामा लिहून दिला. दरम्यान, आयुक्त गणेश पाटील यांनी शिक्षकाला ताबडतोब निलंबित केले.