"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:18 IST2025-04-22T11:15:14+5:302025-04-22T11:18:18+5:30
Crime news: एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याने खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं.

"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
'मम्मी पप्पा, पुन्हा एकदा सॉरी. तुम्ही नेहमी आनंदी रहा. तुमच्याशिवाय माझा चेहरा दुसऱ्या कुणाला बघू देऊ नका.' काळजाचं पाणी पाणी करणारे शब्द आहेत एका १८ वर्षीय विद्यार्थ्याचे. माझे किंवा माझ्या कुटुंबाचे नाव आणि फोटो मीडियामध्ये येऊ देऊ नका, असे म्हणत त्याने गळफास घेतला आणि आयुष्याला पूर्णविराम दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा हॉटस्पॉट ठरलेल्या कोटा शहरात आणखी एका विद्यार्थ्याने आयुष्याचा शेवट केला. कोटामधील कुन्हाडी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली.
वाचा >>'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेला १८ वर्षीय विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहत होता. त्याने आधी सुसाईड नोट लिहिली आणि नंतर दोरीने पंख्याला लटकून गळफास घेतला. पोलीस हॉस्टेलमध्ये पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
'मम्मी पपा, तुमची काही चूक नाहीये'
आत्महत्या केलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, 'मम्मी पप्पा, मी आत्महत्या करत आहे, यात तुमची काहीही चूक नाहीये. नीटच्या परीक्षेमुळेही मी हे करत नाहीये. माझे आणि माझ्या कुटुंबाचे नाव आणि फोटो मीडियामध्ये येऊ देऊ नका.'
'पुन्हा एकदा सॉरी. तुम्ही नेहमी आनंदात रहा. माझा चेहरा तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणालाही बघू देऊ नका', असे त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी कोटाला आलेला मयत विद्यार्थी मूळचा बिहारचा आहे.
आत्महत्या केल्याचे कसे आले उघडकीस?
कुन्हाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी अरविंद भारद्वाज यांनी सांगितले की, हॉस्टेलच्या संचालकाने या घटनेबद्दल पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी हॉस्टेलमध्ये जाऊन त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेमध्ये होता. त्याने दोरीने गळफास घेतला होता.
मयत विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून कोटामध्ये राहून नीट परीक्षेची तयारी करत होता. परीक्षा झाल्यानंतर तो घरी जाणार होता. रात्री त्याने मित्रांसोबत जेवण केले आणि त्यांच्या खोलीत गेला. त्यानंतर त्याने त्याच्या बहिणीला मेसेज केला.
बहिणीने शंका आल्याने याची माहिती हॉस्टेलच्या संचालकाला दिली. त्यानंतर हॉस्टेलच्या संचालकाने त्याचा दरवाजा ठोठावला. पण, आतून प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्याने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दरवाजा तोडला, त्यावेळी त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेमध्ये होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि कुटुंबियांना याची माहिती दिली.