आई, मावशी आणि मावस बहिणीनेच घोटला तरुण मुलाचा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 06:57 PM2018-09-06T18:57:27+5:302018-09-06T18:58:20+5:30
चारित्र्याच्या संशयावरून सतत शिवीगाळ करून अपमानित करणाऱ्या तरुण मुलाचा आई, मावशी आणि मावस बहिणीनेच गळा घोटल्याचे सिडको पोलिसांच्या तपासात समोर आले.
औरंगाबाद : चारित्र्याच्या संशयावरून सतत शिवीगाळ करून अपमानित करणाऱ्या तरुण मुलाचा आई, मावशी आणि मावस बहिणीनेच गळा घोटल्याचे सिडको पोलिसांच्या तपासात समोर आले. १५ एप्रिल रोजी रात्री आंबेडकरनगर परिसरातील गौतमनगरात झालेल्या या हत्येचा उलगडा सिडको पोलिसांनी बुधवारी (दि.५) केला. पुरावा नष्ट करण्यासाठी पिसादेवी रस्त्यावरील सनी सेंटरनजीकच्या विहिरीत मृतदेह नेऊन टाकण्यासाठी मदत करणाऱ्या रिक्षाचालकास सिडको पोलिसांनी अटक केली. मृताची आई कमल दिलीप बनसोडे, मावशी खिरणाबाई जगन्नाथ गायकवाड आणि मावस बहीण सुनीता राजू साळवे, रिक्षाचालक इंद्रजित हिरामण निकाळजे (सर्व रा. आंबेडकरनगर), अशी आरोपींची नावे आहेत. राहुल दिलीप बनसोडे (२८, रा. आंबेडकरनगर), असे मृत तरुणाचे नाव आहे.
सिडको ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी म्हणाल्या की, मृताची आई आरोपी कमलबाई हिचे एका ठेकेदारासोबत अनैतिक संबंध असल्याचे राहुलला खटकत होते. यामुळे तो सतत कमलबाईला शिवीगाळ करून भांडत असे. १५ एप्रिलला सायंकाळी तो कामावरून आला तेव्हा दारू पिलेला होता. त्याने पुन्हा आईला शिवीगाळ केली. त्यानंतर तो बाहेर गेला आणि पुन्हा दारू पिऊन आला. तेव्हा त्याच गल्लीत राहणारी मावशी खिरणाबाई आणि मावस बहीण सुनीतादेखील त्याच्या घरी बसलेली होती. त्यांच्यासमोर तो पुन्हा आईला शिव्या देत मारहाण करू लागला. त्या सर्वांनी मिळून त्याला पकडले. नशेत धुंद राहुलचे हात रुमालाने आणि पाय ब्लाऊजने बांधले. आईने काथ्याच्या दोरीने गळा आवळून त्याला ठार केले. या घटनेची कोठेही वाच्यता होऊ नये म्हणून रात्री साडेदहा ते पावणेअकरा वाजेच्या सुमारास त्यांनी शेजारी राहणाऱ्या इंद्रजितच्या रिक्षात राहुलला टाकले. त्याची तब्येत बिघडली, त्याला दवाखान्यात न्यायचे आहे, असे इंद्रजितला सांगून रिक्षा सनी सेंटरकडे नेण्यास सांगितली. तेथील दवाखाना बंद असल्याचे पाहून त्यांनी राहुलसह आम्हाला येथेच सोडा, आम्ही येतो, तुम्ही घरी जा असे सांगून राहुलचा मृतदेह रिक्षातून उतरवून घेतला.
विहिरीत टाकला मृतदेह
तिघींनी मृतदेह सनी सेंटरजवळील एका बेवारस विहिरीत टाकला. दुसऱ्या दिवशी १६ रोजी सिडको ठाण्यात राहुल हरवल्याची तक्रार कमलबाईने सिडको ठाण्यात नोंदविली. सिडको पोलीस तपास करीत असताना १८ एप्रिल रोजी विहिरीत राहुलचा मृतदेह सापडला होता.
असे उकलले गूढ
मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर घाटीत शवविच्छेदन करण्यात आले. प्रथम सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. काही दिवसांनंतर राहुलचा गळा आवळून खून झाल्याचा अहवाल घाटीतील डॉक्टरांनी दिला. त्यानंतर मे महिन्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला, तेव्हापासून सिडको पोलीस आणि गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करीत होते.
निर्दयी मातेवर संशय वाढला
कमलबाईला एक विवाहित मुलगी आणि राहुल एकुलता मुलगा होता. २५ वर्षांपूर्वी तिचा पतीही विहिरीत पडून मरण पावलेला आहे. मुलाचा कोणीतरी खून केल्याचे पोलिसांनी तिला सांगितले. त्यानंतरही ती एकदाही आरोपींना पकडले का, हे विचारण्यासाठी पोलिसांकडे आली नाही, हे पोलिसांना खटकत होते. यामुळे पोलिसांनी तिचीही चौकशी केली; मात्र ती मला काहीच माहीत नाही, असे सांगत होती. मुलाच्या विरहामुळे ती बोलत नसावी, असेही पोलिसांना वाटायचे.
शंभरहून अधिक जणांची केली चौकशी
सिडको पोलिसांनी राहुलचे मित्र, नातेवाईक, देशी दारूच्या दुकानात येणारे ग्राहक, त्याच्यासोबत काम करणारे, परिसरातील रेकॉर्डवरील संशयित अशा शंभराहून अधिकांची चौकशी केली, तेव्हा राहुलच्या आईचे एका ठेकेदारासोबत अनैतिक संबंध असल्याचे आणि हे राहुलला खटकत असल्याचे पोलिसांना समजले.
शेजाऱ्याने रिक्षा विकली अन्
राहुलचा शेजारी निकाळजेने घटनेनंतर पंधरा दिवसांत रिक्षा विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सिडको पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. शेवटी पोलिसांचे झंझट आपल्या मागे लागेल म्हणून ही घटना लपविल्याची क बुली त्याने दिली. कमलबाई, खिरणाबाई, सुनीता आणि बेशुद्ध राहुलला त्यानेच रिक्षातून सनी सेंटर रस्त्यावर सोडल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कमलबाई, खिरणाबाई आणि सुनीता यांना ताब्यात घेऊन चौकशी क रताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
यांनी केला उल्लेखनीय तपास
पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त गुणाजी सावंत, डॉ.नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक निर्मला परदेशी, सहायक निरीक्षक विश्वनाथ झुंझारे, उपनिरीक्षक भरत पाचोळे, कर्मचारी नरसिंग पवार, राजेश बनकर, दिनेश बन, प्रकाश डोंगरे, संतोष मुदिराज, सुरेश भिसे, किशोर गाढे, स्वप्नील रत्नपारखी, निंभोरे, दुभळकर आणि कमल गुदई यांनी तपास केला.