प्रफुल्ल पटेलांच्या नावे केली पैशांची मागणी; व्यावसायिकाला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 08:09 AM2024-07-27T08:09:35+5:302024-07-27T08:09:50+5:30
प्रफुल्ल पटेल यांच्या नावे थेट कतारच्या राजाशी संपर्क साधत पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : व्यवसायातील तोटा तसेच आई कर्करोगाने त्रस्त असल्याने एका व्यावसायिकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावे थेट कतारच्या राजाशी संपर्क साधत पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र सायबर विभागाच्या कारवाईतून समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी राहुल कांत या व्यावसायिकाला अटक केली आहे.
वांद्रे येथील रहिवासी असलेल्या राहुलचे जुहूमध्ये हॉटेल होते. हॉटेलमध्ये नुकसान झाले. त्यात आईही कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होती. दोन महिन्यापूर्वीच बहिणीचे लग्न पार पडले. त्यातही हातातील सर्व पैसे खर्च झाले. यातूनच राहुलने पटेल यांच्या मोबाइल क्रमांकाशी साधर्म्य असलेला क्रमांक मिळवला. त्याद्वारे व्हॉट्सॲप सुरू केले. पटेल यांचा फोटो व्हॉट्सॲपवर डीपी म्हणून ठेवला तसेच ट्रू कॉलरवर प्रफुल्ल पटेल, असे नाव दिसेल अशी व्यवस्था केली. त्यानंतर त्याने एका ऑनलाइन पोर्टलद्वारे देश-विदेशातील महत्त्वाच्या व्यक्तींचे सचिव, सल्लागारांचे संपर्क क्रमांक मिळवले.
सायबर पोलिसांचा तपास सुरू
राहुलने कतारच्या राजपुत्राच्या सल्लगाराला व्हॉट्सॲपद्वारे मेसेज करत पैशांची मागणी केली. मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी थेट पटेल यांच्याकडे याबाबत चौकशी केली. तेव्हा, आपण कुठलाही मेसेज केला नसल्याचे सांगून पटेल यांनी तत्काळ सायबर पोलिसांत तक्रार दिली. सायबर पोलिसांनी मोबाइल क्रमांकाआधारे राहुल याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पटेल यांच्या नाव आणि फोटोचा वापर करत पैशांची मागणी केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने अशाच प्रकारे आणखीन कुणाला संदेश पाठवले आहे का? याबाबत सायबर पोलिस तपास करत आहे.