मुंबईतही सावकाराचा जाच..., कर्जवसुलीसाठी पालिका कर्मचाऱ्याचे अपहरण करीत मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 06:24 AM2021-12-30T06:24:36+5:302021-12-30T06:24:46+5:30

Crime News : या सावकारी अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेत व्ही. पी. रोड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून सावकाराच्या मुलासह दोघांना गजाआड केले.

Money lender's trial in Mumbai too ..., kidnapping and beating a municipal employee for debt recovery | मुंबईतही सावकाराचा जाच..., कर्जवसुलीसाठी पालिका कर्मचाऱ्याचे अपहरण करीत मारहाण 

मुंबईतही सावकाराचा जाच..., कर्जवसुलीसाठी पालिका कर्मचाऱ्याचे अपहरण करीत मारहाण 

Next

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : ग्रामीण भागाप्रमाणे मुंबईतही सावकारांचा जाच सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे. सावकारी कर्जाच्या वसुलीसाठी सावकाराच्या मुलाने साथीदाराच्या मदतीने पालिका कर्मचाऱ्याचे कार्यालयाबाहेरून अपहरण करीत त्याला बेदम मारहाण केल्याची घटना माझगावमध्ये घडली आहे. 

या सावकारी अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेत व्ही. पी. रोड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून सावकाराच्या मुलासह दोघांना गजाआड केले. बुधवारी त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दुसरीकडे सावकाराविरुद्धही कारवाई करण्याबाबतच्या हालचाली सुरू आहेत.

वांगणी येथील रहिवासी असलेले राजेंद्र नागोटकर (५७) हे पालिकेच्या सी उत्तर विभागाच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २०१४ मध्ये मित्राच्या ओळखीने जगदीश भादरका या सावकाराकडून ७ टक्के व्याजाने ५० हजार रुपये घेतले. ठरल्याप्रमाणे राजेंद्र हे दर महिन्याला ७ हजार रुपये देत होते. मात्र, गेल्या वर्षी कोरोनामुळे कामावर जात नसल्याने राजेंद्र यांना व्याजाची रक्कम देणे शक्य झाले नाही. पुढे जगदीशकडून पैशांसाठी तगादा व धमक्यांचे फोन सुरू झाले. 

कोरोना अनलॉकचा टप्पा सुरू होताच, जूनपासून राजेंद्र हे नियमित कामावर रुजू झाले. त्यानंतर, जगदीशकडून पैशांंसाठी धमक्या सुरूच होत्या. २२ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास जगदीश यांचा मुलगा ऋत्विक (२१) आणि शैलेश बळीद (१८) हे राजेंद्र यांच्या कार्यालयात धडकले. व्याजाचे पैसे कधी देणार यावरून त्यांनी राजेंद्र यांच्याशी वाद घालत त्यांना कार्यालयाबाहेरच मारहाण सुरू केली. त्यानंतर, या दोघांनी त्यांना दुचाकीवर बसवून माझगाव डॉक परिसरात नेले. तेथेही बेदम मारहाण केली. पैसे दिले नाही तर बघून घेण्याची धमकी देत, राजेंद्र यांना जखमी अवस्थेत पुन्हा नागपाडा येथील सी उत्तर विभागाच्या कार्यालयाबाहेर आणून सोडले.
जखमी राजेंद्र यांनी केईएम रुग्णालय गाठत तेथे उपचार घेऊन घरी धाव घेतली. 

सावकाराच्या दहशतीखाली असलेल्या राजेंद्र यांनी सुरुवातीला तक्रार केली नाही. कुटुंबीयांनी त्यांना धीर दिल्यानंतर अखेर राजेंद्र यांनी २४ डिसेंबरला तारखेला पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. व्हीपी रोड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि केईएम रुग्णालयातील वैद्यकीय प्रमाणपत्र ताब्यात घेतले. राजेंद्र यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. 

शासनदरापेक्षा जास्त टक्क्याने कर्जवसुली...
कर्ज वसुलीमागचे मुख्य सूत्रधार सावकार असून, त्याच्यावरदेखील कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीने पोलिसांसह  सहायक निबंधकांकडे (सहकारी संस्था) तक्रार केली. यात, सहकारी संस्थेचे (ई-विभाग) सहायक निबंधक संदीपान मते यांनी केलेल्या चौकशीत सावकार जगदीश भादरका याने शासनमान्य कर्जापेक्षा जास्तीच्या टक्क्याने कर्ज दिल्याचे दिसून आले.

- नागोटकरबाबतच्या नोंदीही हिशोबात मिळून आल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या इतर व्यवहाराची कुंडलीही काढण्यात येत आहे. याबाबत, योग्य ती कारवाई करण्याबाबत पोलिसांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांचा परवानाही रद्द व्हावा अशी मागणी करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीचे दक्षिण मुंबई अध्यक्ष प्रवीण पवार यांनी सांगितले.

Web Title: Money lender's trial in Mumbai too ..., kidnapping and beating a municipal employee for debt recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.