धक्कादायक! पोलीस भरतीमधील पात्र महिला उमेदवारांकडून घेतले पैसे; खंडणीचा गुन्हा दाखल
By राजेश भोस्तेकर | Published: May 16, 2023 03:20 PM2023-05-16T15:20:27+5:302023-05-16T15:21:41+5:30
५ जणी कडून जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने घेतले २१ हजार ५०० रुपये; अलिबाग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल
अलिबाग : रायगड पोलीस दलात भरती पात्र झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी तपासणी प्रक्रिया सुरू असताना उमेदवाराकडून जिल्हा सामान्य रुग्णालयात पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १५ महिला उमेदवाराकडून २१ हजार ५०० रुपये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील आरोपी प्रदीप ढोबळ याने घेतले आहेत. याबाबत सोमवारी रात्री उशिरा ढोबळ यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ढोबळ याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात अजून कोणाची 'मान' अटकणार हे तपासात निष्पन्न होणार आहे.
पोलीस भरती ही पारदर्शक व्हावी यासाठी सर्व खबरदारी पोलीस प्रशासनाने पहिल्यापासून घेतली होती. भरती साठी कोणीही पैसे देऊ नये, फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहन रायगडपोलिसांकडून केले होते. त्यामुळे मैदानी, लेखी परीक्षेत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस भरतीमधील पात्र उमेदवाराच्या वैद्यकीय तपासणीमध्ये मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांने घोळ घातला. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, अलिबाग पोलीस ठाण्याचे सपोनी दत्तात्रय जाधव यावेळी उपस्थित होते.
रायगड जिल्हा पोलिस दलातील भरती प्रक्रिया नुकतीच पार पडली. मैदानी, लेखी परीक्षाही होऊन २७२ पोलीस शिपाई आणि ६ चालक असे २७२ उमेदवाराची पात्र यादी जाहीर झाली. यामध्ये ८१ महिला उमेदवार पात्र झाले आहे. पात्र उमेदवारांची १० मे पासून वैद्यकीय तपासणी प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग येथे वैद्यकीय तपासणी उमेदवाराची घेतली जात आहे. १५ मे रोजी उमेदवाराची वैद्यकीय तपासणी सुरू होती.
१५ महिला उमेदवाराकडे कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीचा तिसरा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे अंतिम वैद्यकीय प्रमाणपत्र मिळणार नसल्याचे सांगून भरती मधून अपात्र होतील अशी भीती आरोपी प्रदीप ढोबळ याने दाखवली. आरोपी याने उमेदवारांना तपासणीसाठी पोलीस मुख्यालयातील रुग्णालयातील आलेल्या वॉर्ड बॉय याला प्रत्येक उमेदवार याच्याकडून पंधराशे रुपये घेण्यास सांगून त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र देऊ असे सांगितले. त्यानुसार वॉर्ड बॉय याने १४ महिला उमेदवार यांच्याकडून प्रत्येकी १५०० तर एका उमेदवार हीच्याकडून ५०० रुपये असे एकूण २१ हजार ५०० रुपये आरोपी ढोबळ याला दिले.
पोलिसांना याबाबत माहिती कळल्यावर वार्डबॉय याच्याकडे चौकशी केली असता त्याने झालेला प्रकार सांगितला. तसेच पैसे दिलेल्या उमेदवार यांनीही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार अलिबाग पोलीस ठाण्यात आरोपी प्रदीप ढोबळ याच्या विरोधात भा द वी कलम ३५४ अंतर्गत खंडणी चा गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आलेली आहे. सपोनी दत्तात्रय जाधव हे पुढील तपास करीत आहेत.
या प्रकरणात कोणाची मान अटकणार
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील कर्मचारी प्रदीप ढोबळ याने पोलीस भरती झालेल्या पात्र महिला उमेदवार यांच्याकडून पैसे घेतले आहेत. मात्र आरोपी ढोबळ याने कोणाच्या सांगण्यावरून हे पैसे घेतले याबाबत कळले नसले तरी त्याबाबत पोलीस तपास करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणात कुठल्या मुख्य आरोपीची मान अटकणार याकडे लक्ष लागले आहे.