जजसाहेब, हत्येचे पुरावे माकडानं पळवले हो! कोर्टात पोलिसांनी दिली अजब माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 06:05 PM2022-05-04T18:05:56+5:302022-05-04T18:07:35+5:30
आम्ही सगळे पुरावे गोळा केले, हत्येसाठी वापरलेला चाकूही हस्तगत केला; पण माकडानं सगळे पुरावे पळवले; पोलिसांची कोर्टात माहिती
जयपूर: पोलिसांनी हत्या प्रकरणात तपास करून पुरावे गोळा केले. पण न्यायालयात सादर करण्यापूर्वी माकडाने ते पुरावे पळवले, असं तुम्ही कधी ऐकलंय का? ऐकायला, वाचायला थोडं अजब वाटत असलं तरी असं घडलंय. एका तरुणाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी अशी माहिती न्यायालयाला दिली. २०१६ मधील हत्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली. पुरावेदेखील गोळा केले. मात्र ते पुरावे न्यायालयात सादर करण्यापूर्वी माकडानं पळवले, असं पोलिसांनी न्यायमूर्तींना सांगितलं.
जयपूरच्या न्यायालयात हा प्रकार घडला. सप्टेंबर २०१६ मध्ये जयपूरच्या चंदवाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या एका प्राथमिक आरोग्य केंद्रात शशिकांत शर्मा नावाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. नातेवाईकांनी त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला. आरोपींवर कारवाई करण्यासाठी आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसी कारवाई करण्यात आली. तपासात आढळून आलेल्या पुराव्यांवरून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्र आणि इतर पुरावे ताब्यात घेण्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.
हत्या झाल्यानंतर पाच दिवसांत पोलिसांनी चांदवाजी परिसरात वास्तव्यास असलेल्या राहुल कंदेरा आणि मोहनलाल कंदेरा यांना अटक केली. पोलिसांनी दोघांना हत्येच्या आरोपात अतिरिक्त जिल्हा न्यायालयात हजर केलं. या प्रकरणात एकूण १५ पुरावे गोळा केला असून त्यात हत्येसाठी वापरण्यात आलेल्या चाकूचादेखील समावेश असल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं.
पुरावे न्यायालयासमोर सादर करण्याची सूचना न्यायमूर्तींनी पोलिसांना केली. त्यावर पुरावे असलेली बॅग माकड घेऊन पळाल्याचं उत्तर पोलिसांनी दिलं. हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू आणि अन्य पुरावे एका बॅगेत ठेवण्यात आले होते. पुरावे ठेवण्यासाठी असलेल्या खोलीत जागा नव्हती. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या एका झाडाखाली बॅग ठेवण्यात आली. तिथून ती बॅग एका माकडानं पळवली, अशी माहिती पोलिसांनी लिखित स्वरुपात न्यायालयाला दिली.