Jaipur Court Monkey: अरे तो बघ! न्यायाधीशही शॉक झाले; खून खटल्याचे पुरावे घेऊन माकड कोर्टातून पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 07:33 AM2022-05-09T07:33:42+5:302022-05-09T07:36:37+5:30
Jaipur Court Monkey: एका आरोग्य केंद्रात शशिकांत शर्मा यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूची चौकशी व्हावी म्हणून नातेवाईकांनी जयपुर - दिल्ली हायवेवर रास्ता रोको केला होता. या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. तेवढ्यात...
जयपूर मर्कटलीला पाहून सर्वांनाच हसायला येते, पण राजस्थानातील पोलीस मात्र रडकुंडीला आले आहेत. जयपूर येथील कनिष्ठ न्यायालयात एका हत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी सुरू होती. इतक्यात, एक माकडन्यायालयात शिरले. हत्येसाठी वापरलेला चाकू व इतर पुरावे ठेवलेली पिशवी घेऊन क्षणार्थात 'फरार झाले. या अजब घटनेवर समाजमाध्यमांत उदंड चर्चा सुरू आहे.
या माकडाने जेव्हा पिशवी पळविल्यानंतर पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, हत्या प्रकरणात वापरलेला चाकू व अन्य महत्त्वाचे पुरावे त्या पिशवीत ठेवलेले होते. आता खुन्याविरोधात आमच्या हाती कोणतेही पुरावे नाहीत. त्यावेळी मात्र खळबळ माजली. माकडाने पुराव्याची पळविलेली पिशवी शोधण्यासाठी न्यायालयाच्या भोवतालचा परिसर पिंजून काढला. मात्र, त्यांच्या हाती अजून ती पिशवी लागलेली नाही.
एका आरोग्य केंद्रात शशिकांत शर्मा यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूची चौकशी व्हावी म्हणून नातेवाईकांनी जयपुर - दिल्ली हायवेवर रास्ता रोको केला होता. यांनतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत आरोपीला अटक केली होती.
पोलिसांची अशी झाली पंचाईत
शशिकांत शर्मा यांची हत्या झाल्याचे सबळ पुरावे पोलिसांनी न्यायालयाला सादर केले. या खटल्याची सुनावणी सुरू असतानाच माकडाने पुराव्याची पिशवीच पळविल्याने पोलिसाच्याही तोंडचे पाणी पळाले आहे.
आरोपीला फायदा मिळणार का?
माकडाने सर्व पुरावे पळविल्याने त्याचा फायदा या हत्या प्रकरणातील आरोपीला मिळणार का, अशीही चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे. न्यायालयात माकडाने केलेली करामत याला न्यायाधीशांपासून सारेच लोक साक्षीदार आहेत. त्यामुळे हाती पुरावेच नसल्यावर आरोपीवर न्यायालयात खटला कसा चालविणार, न्यायाधीश खटल्याचा निकाल तरी कसा देणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.