Goldy Brar detained: सिद्धू मुसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाईंड गँगस्टर गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 08:54 AM2022-12-02T08:54:13+5:302022-12-02T08:55:08+5:30
Goldy Brar detained in California: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियातून अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली-
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार याला कॅलिफोर्नियातून अटक करण्यात आली आहे. भारताच्या गुप्तचर विभागातील सुत्रांच्या हवाल्यानं ही माहिती समोर आली आहे. अद्याप कॅलिफोर्नियाकडून भारत सरकारला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
२९ मे रोजी सिद्धू मुसेवाला याची पंजाबमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. भर रस्त्यात मुसेवालावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगनं स्वीकारली होती. या संपूर्ण कट आखण्याचं काम गोल्ड ब्रार या गँगस्टरनं लॉरेन्स बिश्नोईच्या साथीनं केलं होतं. मुसेवालाच्या हत्येचं संपूर्ण प्लानिंग गोल्डी ब्रारनं केलं आणि शूटर्सच्या मदतीनं सिद्धू मुसेवालावर हल्ला करण्यात आला होता. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी ३४ जणांना आरोपी केलं आहे.
गोल्डी ब्रारवर १६ हून अधिक गुन्हे
सतिंदरजीत सिंह उर्फ गोल्डी ब्रार हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा मानला जातो. गेल्या वर्षी पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यातील एका न्यायालयानं युवा काँग्रेस नेता गुरलाल सिंह पहलवान याच्या हत्या प्रकरणात गोल्डी ब्रार विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. १६ हून अधिक गुन्ह्यांच्या प्रकरणात गोल्डी ब्रारच्या मागावर पोलीस होते. तो भारतातून कॅनडा पळाला होता.
रेड कॉर्नर नोटीसही जारी
गेल्या दिवसांत इंटरपोलनं गोल्डी ब्रार विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. गोल्डी ब्रारनं कॅनडामधून सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट रचला होता. याप्रकरणी तिहार तुरुंगात कैद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची देखील चौकशी सुरू आहे. गोल्ड ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई एकाच कॉलेजमध्ये होते. बोल्डी ब्रारवर हत्या, हत्येचे प्रयत्न आणि गुन्हेगारी कट रचणे तसंच हत्यारांची अवैधरित्या तस्करी करण्याचे आरोप आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"