भट्टीत जाळून हत्या करण्यात आलेला 'तो' जिवंत सापडला; घटनाक्रम ऐकून पोलिसांना धक्का बसला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 10:14 AM2022-02-10T10:14:33+5:302022-02-10T10:18:05+5:30
६ महिन्यांपूर्वी स्वत:ला जिवंत जाळून घेणारा पोलिसांना जिवंत सापडला
मुरादाबाद: उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. स्वत:ला भट्टीत जिवंत जाळणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकून पोलिसांनी हत्येचं षडयंत्र उघडकीस आणलं. एसएसपी बबूल कुमार यांनी पत्रकार परिषद घेत घडलेला घटनाक्रम सांगितला.
१५ ऑगस्ट २०२१ रोजी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या भटावली गावच्या चेतरामन यांनी त्यांचा मुलगा जयवीरच्या हत्येची तक्रार दाखल केली. जयवीरला भट्टीत जाळण्या आलं. त्यानंतर त्याचा मृतदेह गायब करण्यात आल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात नोंदवली. चेतराम यांनी जयवीरच्या सासरच्या मंडळींबद्दल संशय व्यक्त केला. त्यामुळे शांती नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या तुलाराम, शांती देवी, विक्रम सिंह, राजू सिंह आणि सुमन यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला.
या प्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर सिव्हिल लाईन्स पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी जयवीरला जिवंत पकडत हत्येचं षडयंत्र उघडकीस आणलं. पत्नी आणि सासरच्या मंडळींना तुरुंगात पाठवण्यासाठी वडिलांच्या मदतीनं जयवीरनं संपूर्ण कट रचला होता. त्यासाठीच भट्टीत स्वत:ला जाळून मृतदेह गायब करण्याची कहाणी रचण्यात आली. सिव्हिल लाईन्स पोलिसांनी आरोपीला गोव्यातून अटक केली.
आरोपी जयवीर आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद होता. त्यामुळे पत्नी आणि सासरच्या लोकांना खोट्या खटल्यात अडकवण्याची योजना जयवीरनं आखली. षडयंत्राचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी जयवीर आणि त्याच्या वडिलांना बेड्या ठोकल्या. यामध्ये जयवीरच्या भावाचादेखील समावेश होता. त्यामुळे पोलिसांनी त्यालादेखील अटक केली.